पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिची मुलं मोठी झाली नि मामा-भाच्यांचे खटके उडू लागले. मग बिपिनमीराने पदरात असलेल्या कैलाससह कोल्हापूरला आपलं बि-हाड हलवलं. इथे दहा बाय दहाच्या खोलीत विठ्ठल त्याची बायको कुसुम, आई लक्ष्मीबाई, बहीण बेबी, विठ्ठलचा मुलगा दीपक, मीरा, बिपिन, कैलास सर्व एकत्र कसे तरी राहत. मिळवणारा एक व खाणारे दहा असं किती दिवस चालणार होतं! शेवटी तो दिवस उजाडलाच. बिपिननी एक झोपडीसारखी खोली नाममात्र भाड्यानी घेतली ती स्वतः काही तरी करायचं ठरवून.
 तो काळ मीराच्या जीवनातील अत्यंत काळाकुट्ट असा काळ होता. त्यांनी घेतलेली खोली वेश्यांच्या वस्तीत होती. ते ज्या खोलीत राहात तिथेही पूर्वी एक वेश्याच राहात असे. खोली मातीने बांधलेली. दार नाही. एक बारदान (पोतं) आडोसा म्हणून टांगलेलं. जमीन सारवलेली ओबडधोबड. कुत्री, मांजर, डुकरं सतत येत राहायची. हे कमी म्हणून की काय गि-हाइकं वेश्या राहते समजून यायची. मीराला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. बिपिन दिवसभर हातगाडीवर भजी, चहा तयार करायचं काम करायचा. रोज येताना उरलेले पाव, वडे, भजी आणाचा. मीरा त्यावरच दिवस काढायची. दिवस ढकलता येईना म्हणून मीराने शेजारच्या कॉलनीत धुण्या-भांड्याची कामं घेतली तशी कैलासच्या तोंडात दोन शितं पडू लागली. मग बिपिननं काम बदललं. तो उद्यमनगरात एका कारखान्यात ड्रिलिंगचं काम करू लागला; पण घरच्या ओढाताणीने खाडे व्हायचे. त्यातून घरात मीराशी वाद व्हायचा. एकदा तर रागात त्यानं उलथनं भिरकावलं. डोळ्यांतच लागायचं. ते डोक्यावर निभावलं. टाके पडले. सुनील, विठ्ठल, बेबी, सुमंत सर्वांनी बिपिनला समजावलं तशी गाडी रूळावर आली. सहा महिन्यांनी बिपिनला आंतरभारती शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लागली व मीराचा वनवास संपला म्हणायचा.

 पुढे मीराला पण काळजीवाहिका म्हणून बालकल्याण संकुलाच्या वात्सल्य बालसदनमध्ये कायमची नोकरी मिळाली. भाड्याचं चांगलं घर, सुखी संसार सुरू झाला. नि स्वरूपाचा जन्म झाला. त्यानं तिच्या जीवनाचं स्वरूप बदललं. नव-याच्या बदल्या उदगाव, निगवे इथे होत राहिल्या, तरी मीरानं धीर धरत संसार केला. कोल्हापुरी आल्यावर मग हळूहळू घर घेतलं. मुलं शिकली, सवरली मोठी झाली. त्यांची लग्नं, संसार यात पण मीरास काही कमी सोसावं लागलं नाही. कैलास मोठा झाला नि आँगमध्ये राहू लागला. दिवसभर कुठे असायचा ते माहीत नसायचं. रात्री स्वारी फक्त झोपायला दिसायची. सुनीलला सांगून त्यांची नाकेबंदी केली तसा

दुःखहरण/७२