पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पद्धतीने ठामपणाने सांगत होते, त्यामुळे काहीसे संकोचून मी ही जबाबदारी स्वीकारली.
 सुनीलकुमार लवटे यांचे या ग्रंथातील लेखन हे प्रामुख्याने दै. प्रहारच्या रविवार आवृत्तीतून प्रसिद्ध झाले आहे तर काही दै. सकाळ मधून प्रसिद्ध झाले आहे. लवटे यांना त्यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तीसंबंधीचे हे लेखन आहे. ते दीर्घकाळ या सामाजिक समस्याग्रस्त जगाशी निगडित राहिले आहेत. प्रत्यक्ष त्यांनाही या जगाचे चटके सहन करावे लागलेले आहेत.
 तसे पाहिले गेले तर भारतीय समाज फार गुंतागुंतीचा आहे. या समाजरचनेत अनेक ताण आणि तणाव आहेत. वर्ग आणि वर्णभेद आहेत. या समाजात मोठ्या प्रमाणात बेदखल असे वंचितसमूह आहेत. दुःखहरणचा मुख्य विषय आहे तो म्हणजे वंचितांचे जग. हे वंचितांचे विश्व अर्थात चहुबाजूचे. ते केवळ आर्थिकच नाही तर विविध तव्हेचे आहे. मनुष्यपण हिरावून घेतलेल्या माणसाचे जग या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. लवटे यांनी या लेखरूपांना वंचित कथांचा संग्रह म्हटले आहे. इतर वंचित, शोषितांना स्वसुरक्षिततेचा काही ना काही आधार व जगण्याची काही ना काही शाश्वती असते. तसे या पीडित-वंचित निराधार माणसांना कशाचीही शाश्वती व स्थिरता नसते. सर्वार्थाने ते निराधार असतात. चहूबाजूने उस्कटलेले, विसाव्याचे काहीच ठिकाण नसणाच्या समूहसंवेदनेचा आविष्कार या लेखनात आहे.
 मराठी साहित्यात विविधक्षेत्री अनुभवाचा प्रवेश फारसा झालेला नव्हता. १९६० नंतरच्या काळात मात्र महाराष्ट्राच्या विविध भूप्रदेशातील तसेच अज्ञात सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचे प्रकटीकरण काही प्रमाणात झाले. मात्र अजूनही मानवी जीवनाची अनेक अलक्षित जीवनक्षेत्रे प्रतिभावंतांच्या नजरेच्या टप्प्याबाहेर आहेत. त्यापैकीच वंचितांचे हे एक जग आहे. मानवी व्यवस्थेचे बळी ठरलेले हे जग मराठी लेखनातून फारसे आविष्कृत झालेले नाही.
 प्राचीन काळापासून असा वंचित समूह जगभरात पाहायला मिळतो. त्यांच्या अस्तित्वाची दखल ना समाजाने घेतली, ना शासकांनी घेतली, ना लेखक-कलावंतांनी. ते जसे आपल्या समाजकक्षेच्या परीघाबाहेर राहिले तसेच ते अभिजनांच्या लेखनप्रकल्पाच्या बाहेर दुर्लक्षितच राहिले. एका बाजूला वंचित समूह हा नेहमीच उपेक्षेचा, हेटाळणीचा विषय राहिला