पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सचिनचं साहेबी स्वप्न


 ऑगस्ट, २००५ चे दिवस असतील ते. मी आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नुकताच रुजू झालो होतो. प्रवेश संपून कॉलेजचे वर्ग सुरू झाले होते. मग प्राचार्य म्हणून मी त्या दिवशी विद्याथ्र्यांशी हितगुज करणार होतो. प्राचार्य अभिभाषण' असं भारदस्त नाव घेऊन घातलेला तो घाट... भाषणात मी बरीच स्वप्नं मांडली. त्यात हे महाविद्यालय ‘अपंगांचं स्वराज्य असेल असं बोलून गेलो होतो... टाळ्याही मिळाल्या होत्या.
 दुस-या दिवशी हे सारं काहूर कानात भरलेलं असताना एक पालक भेटायला आले. त्यांनी ठोकलेल्या सॅल्यूटवरून लक्षात आलं की, हे एक्स सर्व्हिसमन... निवृत्त सैनिक असणार... मी त्यांना नि त्यांच्या मुलाला बसायला सांगितलं. हातातल्या कागदपत्रांवर सह्या पूर्ण केल्या नि बोला म्हणालो. “सर, मी सुभाष काळे. सीआयएसएमध्ये हवालदार होतो. या मुलासाठी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली सर...' म्हणत ओकसाबोकशी रडायला लागले. मी बेल वाजवून शिपायाला पाणी द्यायला सांगितलं. त्यांना शांत केलं. मुलगा कावराबावरा होऊन हे सारं ऐकत होता. खुणेनंच बाबांना धीर देत होता. त्याच्या कानातील श्रवणयंत्र व त्याच्या हावभावावरून एव्हाना माझ्या हे लक्षात आलं होतं की, तो मूक-बधिर आहे.

 तुम्ही मनात काही न ठेवता सर्व बोला. मला वेळ आहे. एव्हाना मी शिपायास आत कोणास सोडू नको, असं बजावलं होतं... तसं ते आश्वस्त होऊन सांगू लागले...

दुःखहरण/६४