पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकशिक्षकी शाळा बघता-बघता बहुशिक्षकी झाली तरी समाधान होईना... मग शाळेत घालायचं ठरवलं... अनेक अडचणी होत्या. बसणं, बोलणं, शी-शु... वल्लरी तर भित्रा ससा... माँटेसरी... पहिलीपासून हा विद्यार्थी ‘एक्स्टर्नल'... सगळे भाऊ... ताईंना शंभर प्रश्न विचारायचे... त्यांनी जिद्द सोडली नाही. घरी अभ्यास करून परीक्षेला बसायची खास परवानगी मिळविणे म्हणजे साक्षात आकाशीचा चंद्र मिळविणेच होते... उशिरा का होईना चंद्र उगवायचा यावरच भाऊ खुश!
 असं करत वल्लरी चौथी पास झाली नि भाऊंच्या कानात ‘झिंदाबाद! झिंदाबाद' ऐकू येऊ लागलं! भाऊ वल्लरीला तीनचाकीवरून शाळेला नेऊ लागले... सायकलीला घुगुरजोडी बांधलेली. ही घंटा वाजली की घोळका जमायचा... वर्गात संगीता, ज्योत्स्ना, पल्लवी, वल्लरीच्या मैत्रिणी झाल्या. तशी वल्लरी शाळेत रमू लागली.. वेळ झाली की बेचैन व्हायची! सातवी, आठवी करत वल्लरी दहावीत गेली, तेही चांगल्या मार्कानी! सायकल घेत तिनं केलेला प्रत्येक पराक्रम हनुमान उडीपेक्षा कमी नव्हता.
 ऑक्टोबर ८९ ला वल्लरीचा फॉर्म भरला... सहीच्या जागी अंगठा उठवला... बघता बघता मार्च उजाडला तसं नवं संकट दिसू लागलं... रायटरसाठी अर्ज केला... परवानगी मिळेना... बोर्डाला हे प्रकरण नवीनच... शिवाय आमचा एक विशेष अर्ज होता... वल्लरीबरोबर आईला लांब दिसेल असं बसू द्यावं... लाख विद्याथ्र्यांतली एक वल्लरी... पण विजय पाटील म्हणून बोर्डाचे अधिकारी पाठीशी उभे राहिले अन् तिने परीक्षा दिली... हे सारं पुण्याच्या अनेक फे-यांनी घडलं; पण केल्याने होत आहे। रे, आधी केलेची पाहिजे... सांगणारं! तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा... वल्लरी ७६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली... संस्कृतमध्ये ९१ गुण पाहून वल्लरीनं संस्कृतमध्ये बी. ए. करायची घोषणाच करून टाकली!

 वल्लरी आता भाऊंच्या लूनावर त्यांना मागं घट्ट धरून कॉलेजात जाऊ लागली... बारावी झाली... एफवायबीएला ती अपंग असल्यानं शिवाजी विद्यापीठास जादा अर्धा तास पेपर सोडवायला वेळ वाढवून मागितला... नियम नसल्यानं नामंजूर' असं छापील उत्तर आलं... आपल्या शिक्षणात ‘सब घोडे बारा टक्के' असतं... दोन पाय असणा-यानं व लंगड्यानं एकाच शर्यतीत भाग घ्यायचा व दोघांनी एकाच वेळी शर्यत पूर्ण करायची याला काय सामाजिक न्याय म्हणायचा? न्यायदेवतेबरोबर शिक्षणही आंधळ्याच्या गाई हाकतं हे कळलं... हे सारं विषण्ण करणारं... अन्यायाचं होतं; पण भाऊ, ताई, आत्यांची भीष्मप्रतिज्ञाच होती.. लढल्याशिवाय शस्त्र खाली नाही ठेवायचं... हरायचं नाही... मग नाकच्या काढत यश यायचं... वल्लरीसारख्या विशेष मुलांना विशेष नियम, सवलती नको

दुःखहरण/६२