पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


बोलायची तर दूरच... पण भाऊ, ताई, आत्यांचे प्रश्न सुरूच... जिंकू किंवा मरू या जिद्दीनं... कमल नमन कर... आई, आत्या, भाऊ सर्वांची शिकवणी २४ तास सुरू... वल्लरी काहीबाही मोठ्या जिकिरीनं बोलायचा प्रयत्न करायची... तेवढ्यावर घरातले सारे खूश... ओठ हालत नव्हते... आता हलतात... हसत नव्हती आता हसते... भाऊ, ताई, आत्या म्हणजे सारे एवढ्यावरच फिदा, मग लक्षात आलं की, वल्लरीला रेडिओ ऐकायला आवडतो. मग बाळाच्या तोंडात निपल धरतात, तसं ते रेडिओ लावून ठेवायचे... बॅटरीवरचा रेडिओ आता इलेक्ट्रिक करून घेतला... 'सिग्नेचर टून... वंदे मातरमपासून ते उद्या भेटू या सकाळी सहा वाजता' अशी उद्घोषणा होईपर्यंत रेडिओ ओऽऽ करत रहायचा. नि वल्लरी गुणगुणत रांगत... बसू, टेकू लागली.
 असेच काही दिवस गेले... त्यावेळी सांगली आकाशवाणीवरून सकाळी साठेआठच्या बातम्या संपल्या की, दर रविवारी सकाळी नवं गीत महिनाभर ऐकवलं जायचं... ८.४५ वाजता बातम्या लागल्या की, वल्लरी गुणगुणायला लागायची... महिना संपला की नवं गीत कोणतं ते आवर्जून ऐकायची... प्रत्येक रविवारी रेडिओ लावायची आठवण करायची... तिची प्रगती आश्वासक होती... एका रविवारी तर तिनं आई, बाबा, आत्याची विकेटच घेतली... त्या महिन्यात सरिता पदकीचं गीत लागायचं... शेवटच्या रविवारी वल्लरीनं शिरा ताणत, जीभ वळवत, दात ओठ खात मोठ्या जिद्दीनं धृवपद सर्वांना ऐकवलं-
 लाख लाख या दीपकळ्यांचा, प्रकाश आपण उजळू या।
 पदराखाली जपुनी त्यांना, वादळातही फुलवू या।।

 तिनं प्रत्येकाची टाळी घेतली, तशी भाऊंची पण ब्रह्मनंदी टाळी लागली. त्यांनी तिची प्रगती बघून तिला शाळेत घालायचं ठरवलं... आमचं दोघांचं शिक्षणही अडथळ्यांच्या शर्यतीतून पार पडलं होतं... त्यामुळे हरणारी प्रत्येक शर्यत जिंकायची कशी, याचं बाळकडू प्यायलेले आम्ही... मी पोरका... ही कव्र्यांच्या हिंगण्याच्या अनाथ महिलाश्रमात राहून शिकलेली... त्यामुळे सारं लेटच झालं. शिक्षण, लग्न, मूल, संसार सर्व, पण यातून एक शिकलो... लढल्याशिवाय हरायचं नाही! ऑपरेशन करून तिला बसतं केल्यावर तिला शिकवावं असं ठरवलं... कठीण होतं; पण अशक्य नव्हतं... घरी मुळाक्षरं... अंक... पाढे... गणितं सुरू केली... इथं आईचं पूर्वीचं शिक्षिका होणं उपयोगी पडलं... त्यांनी आपल्या या शाळेचं नाव ‘समजूतदार विद्यालय' ठेवून टाकलं... तेच शिक्षक, परीक्षक,

दुःखहरण/६१