पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 वासंती नगरसेविका झाली. तिचं जग बदललं... जीवनही! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईची धुणी-भांडी बंद झाली. वासंतीला आपल्या परिस्थितीचं चांगलं भान होतं... ऑपरेशन झालं तरी आपण आई होऊ शकणार नाही, हे ती ओळखून होती... ती एक दिवस मला भेटायला आली... म्हणाली, ‘दादा, मी कष्टानं सारं मिळवलं... पद, पैसा, प्रतिष्ठा सर्व पण दादा, आई-बाबा उदास असतात. आतल्या आत झुरतात. जगासाठी माझ्यासारखं सुखी दुसरं नाही अन् माझ्यालेखी माझ्यासारखं दुःखी कुणी नाही... मी वरवरचं हसत राहते... आत काळीज करपत राहतं... सगळं असून नसल्यासारखं. मी किरणला पण आता घरी नेणार आहे; पण त्याआधी मला एक बाळ दत्तक घ्यायचंय!
 हे ऐकून मला सारं स्वप्नासारखं वाटत होतं... पण ती एक सत्यकथा होती. आम्ही मग दुस-या एका संस्थेशी संपर्क साधून तिला बाळ मिळवून दिलं. नंतर ती ठरल्याप्रमाणे किरणलाही घेऊन गेली आणि मी वर्षोनवर्षे रोखलेला श्वास सोडला... जीव भांड्यात पडला माझा पण नि त्या अधीक्षिका बाईंचा पण...
 हल्ली वासंतीचा फोन म्हणजे नवा धक्का हे ठरूनच गेलं होतं. ती मोठ्या आत्मविश्वासानं सारं करत राहायची. मोर्चे-निदर्शने घेराओ... सर्व सुधारणा तिनं झोपडपट्टीत घडवून आणल्या आश्वासनाप्रमाणे. आज तिनं नवाच धक्का दिला, “दादा, मी लग्न केलंय... सारं सांगून... ते तरीही तयार झाले... तसं आम्ही गेले तीन वर्षे एकत्र हिंडलो, फिरलो आहे."
 ... त्यांचं एकच म्हणणं आहे... “तुझं हे वरवरचं हसणं मला जाळतं... मला तुला खरं सुखी करायचंय! दादा, आम्ही अनेक रात्री एकत्र घालवल्यात त्यांना सुख मिळतं... मला पण... आणि काय हवं? किरणचं पण जमवत आणलंय. जमलं की कळवीन.'

 मला तिच्या स्वप्नामागून स्वप्नांच्या झटापटीचं आश्चर्य वाटत राहतं. वाटतं, अशी सा-यांचीच स्वप्नं सत्य व्हायला हवीत... प्रश्न सुटायला हवेत! त्याचसाठी होता हा सारा अट्टाहास!

दुःखहरण/५३