पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिस्थितीलाच थकवायचं... शरण यायला भाग पाडायचं... आपण मात्र कधीही परिस्थितीला शरण जायचं व्हायचं नाही. मग एक दिवस वाराच काय वादळही शमतं... शरण येतं... शरणागत होतं. वादळवाटाच मग पाऊलवाटा होऊन जातात... त्या थकलेल्या वाटसरूंना दिलासा देतात... वाट दाखवितात.
 काही दिवसांनी वासंती पिग्मी बचत गोळा करायचं काम करू लागली. घरोघरी तिचा राबता... संपर्क सुरू झाला. आईची धुण्याभांड्याची कामंही इथंही सुरू होती. वडील आज अंथरुणाला खिळले होते. पत्र्याच्या खोलीतून झरणारे कवडसे त्यांच्या मनात किरणांची स्वप्नं पेरत राहायचे... वासंतीच्या जीवनात वसंत ऋतू यावा... ती उजवली जावी, असं मनोमन वाटत राहायचं... ते एका घोर लागलेल्या बापाचं स्मरणरंजन... स्वप्नरंजन असायचं. वासंतीला ते न सांगताही कळत राहायचं... एव्हाना तिची झटापट आपल्या परीनं सुरू असायची... कधी मोडायची, वाकायची... तुटली, हारली असं मात्र कधी झालं नाही.
 दोन-चार वर्ष अशीच निघून गेली अन् महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. झोपडपट्टीत एकच गोमगाला सुरू झाला. वासंती वाशिमकर... अपक्ष उमेदवार... कप बशीपुढे फुली मारा... वासंती वाशिमकरांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, म्हणत साच्या कुडाच्या भिंती रंगल्या... वासंतीवर मोठे पक्ष दबाव आणू लागले... धमक्या सुरू झाल्या... पण ती बधली नाही. लोकांनीच तिला उभं केलं होतं. लोकच वर्गणी गोळा करायचे. गेल्या दोन निवडणुका जिंकणाच्या अशोक लवांगरेविरुद्ध अर्ज भरायचा खायचं काम नव्हतं... पण फॉर्म भरायच्या दिवशी आख्खी झोपडपट्टी रोजगार बुडवून हजर राहिली अन् एका अर्थाने निवडणुकीचा निकालच जाहीर झाला. विरोधकांचं धाबं दणाणलं. वासंतीच्या विजयाची घोषणा आता एक औपचारिकताच होऊन राहिली.

 वासंतीचं पिग्मी गोळा करणं नि मत मागणं एकाच वेळी होत राहिलं... ती भेटेल त्याला एकच सांगत राहायची... गरिबाची कळ गरिबालाच येणार... आपण एकीनं राहू... झोपडपट्टी सुधारू... नुसतं ओळखपत्र, रेशनकार्ड मिळालं म्हणजे झालं नाही... वीज, गटार, रस्ते, पाणी, संडास... सगळं आपल्याला मिळाय हवं. दवाखाना व्हायला हवा... झोपडपट्टीत राहणारे बीड, उस्मानाबाद, वाशिम, पंढरपूरहून आलेले... सगळ्यांना वासंती आपली मुलगी वाटायची.

दुःखहरण/५२