पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


डॉक्टरांनी यासाठी थोडा वेळ घ्यायचं ठरवलं. मोठ्ठ्या मुलाचं वसंताचं नाव वासंती करायचं. छोट्या मुलाचे किरणचं नाव तेच ठेवायचं. ते मुलाचंही असतं नि मुलीचंही... बदलायची गरज नव्हती. पालकांचा वस्तुस्थितीदर्शक अर्ज घ्यायचा. सोबत डॉक्टरांचं पत्र, प्रमाणपत्र जोडायचं. योग्य वेळी दोघांची ऑपरेशन्स करायची आणि त्यांना गाव बदलून सुस्थापित करायचं.
 आमच्याकडे बालगृह, निरीक्षणगृह, आधारगृह तिन्ही प्रकारच्या मुलींच्या संस्था होत्या. छोट्या किरणला मुलींच्या निरीक्षणगृहात तर वसंतला वासंती म्हणून महिला आधारगृहात ठेवायचं ठरलं. हे सारं संस्थेत माझ्याशिवाय फक्त अधीक्षिकेलाच माहीत होतं. ते त्यांच्यापुरतंच माहीत राहील अशी काळजी घ्यायचं ठरलं. शिवाय इतर मुलींपासून या दोघांचं राहणं, झोपणं, वेगळं राहील याची काळजी घ्यायचंही ठरलं... ते महत्त्वाचं होतं. तत्पूर्वी आम्ही महिनाभरात दोन-तीनदा आई, वडील, मुलं, डॉक्टर, अधीक्षिका, मी अशा एक दोन अनौपचारिक, बैठका घेऊन कसं राहायचं, पथ्य काय पाळायची इ. विषयी आपसांत बोलून, ठरवून घेतलं. संवाद, चर्चा, शंका, समजावणं सारं केलं... हे सारं संस्थेबाहेर घडवून आणलं. कारण संस्थेत आम्हास याचा बभ्रा नको होता.
 महिनाभरानंतर वासंती व किरण मुली म्हणून संस्थेत आल्या... राहू लागल्या. डॉक्टरबाई अधी-मधी येऊन भेटत, बोलत, उपचाराच्या अंगाने काळजी घेत राहायच्या.
 ती दोन वर्षं मात्र मी नि त्या अधीक्षिका विलक्षण तणावाखाली होतो... माझ्यापेक्षा त्या अधिक... रोज मनात पाल चुकचुकत राहायची. हा एक अंगलट येणारा प्रयोग होता. विषाची परीक्षाही होती. वासंती सोळा वर्षांची होऊन आम्ही तिला आई-बाबांच्या ताब्यात दिली. एव्हाना ते पालक सोलापूर सोडून कोल्हापूरला राहू लागले होते. वासंती समाजाच्या, शेजाच्यापाजाच्यांच्या लेखी मुलगीच होती. एस.एस.सी. झालेल्या वासंतीला आमच्यापेक्षा परिस्थितीनं बरंच शिकवलं होतं.

 ती ज्या झोपडपट्टीत राहात होती तिथं तिनं संस्थेकडून प्रेरणा घेऊन छोटी-मोठी मदत करायला सुरुवात केली. तिला संस्थेत असताना हे समजावण्यात आलं होतं की, ज्यांचे जीवन वादळ घेऊन जन्मतं... सोसाट्यांचे वारे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असतात. त्यांच्या हातात एकच असतं... तो वा-याची दिशा बदलू शकतो. झुंजून... झटापटीत

दुःखहरण/५१