पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका स्वप्नाशी झटापट


 मी संस्थेत नित्याप्रमाणे काम करीत होतो. एवढ्यात एक बाई ‘‘मे आय कम इन?" असं म्हणत आत आल्या. मी “या, बसा' म्हणत स्वागत केले. तसं बसत त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड माझ्यासमोर टेबलावर ठेवलं. 'डॉ. सुषमा भोसले, एम्. डी. (इंडोक्रायनॉलॉजी) उमा क्लिनिक, बार्शी, जि. सोलापूर. “माझा एक प्रॉब्लेम आहे. तुमच्या संस्थेबद्दल ऐकून आहे. म्हणून सोलापूर, पंढरपूर ओलांडून इकडे आलेय." त्या ब-याच तणावाखाली आहेत असं जाणवत होतं. “तुम्ही रिलॅक्स व्हा... हे पाणी घ्या... हवं तर चहा मागवतो' म्हणत मी बेल वाजवली. शिपायास चहा, पाणी आणायला सांगितलं, तशा त्या थोड्या सैल होऊन बसल्या नि बोलू लागल्या.

 “मी बार्शी, सोलापूर इथं प्रैक्टिस करतेय. माझ्याकडे एक प्रॉब्लेमेटिक केस आली आहे... तुम्ही मदत कराल, मार्ग काढाल, असं कळल्यावरून आलेय. एक गरीब कुटुंब आहे. आई, वडील, त्यांची दोन मुलं... मूळचे ते वाशिमकडचे. इकडे सोलापुरात गिरणीत काम मिळालं म्हणून आले. गरिबीचा असला तरी सुखाचा संसार चालला होता. एक दिवस वडील काही कामानिमित्ताने कुडुवाडीतून बार्शीला जात होते. पंढरपूरची वारीची गर्दी परतत होती. दारात लटकत प्रवास करत होते. गर्दीच्या चेंगराचेंगरीत ढकलाढकलीत फेकले गेले. अधू झाले हाता-पायांनी... तशी नोकरी गेली. अपघाती विमा, ग्रॅच्युईटी इत्यादीचे थोडेबहुत पैसे हाती आले... छोटी-छोटी कामं करत राहिले. त्यांची मंडळी धुणी-भांडी करायला लागल्या.

दुःखहरण/४९