पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नाही... इतर अनेक जण तेच सांगायचे... छापील रिपोर्टासारखे असायचं ते... जेलर सांगायचे... दोन रिपोर्ट एकसारखेच... झेरॉक्स नसले तरी झेरॉक्सच!
 निकाल लागल्याला आता सात वर्षं उलटलीत दादा... अजून सात वर्ष शिल्लक आहेत. रोज मनाच्या भिंतीवर रेघ नाही... ओरखडा ओढतो... इथं दिवस उगवतो... पण सूर्य लवकर मावळत नाही... इथं तुरुंगात रात्र होते, पण ती सरता सरत नाही... डोळ्याला डोळा लागत नाही... इथं घोरण्याचा आवाज नसतो... सगळे कुशी बदलत झोप घेण्याचा प्रयत्न करत असतात... डोळे मिटून पडणं म्हणजे इथे झोपणं असतं... डोळ्यांसमोर रोज विठ्ठल नि रुक्मिणीच असते.... प्रत्येकाचं वादळ वेगळं, वारा न्यारा!

 आताशा मात्र मी दोघांनाही माफ केलंय! गेल्या सात वर्षांत मला एकच कळून चुकलंय दादा... माणसानं क्षणावर विजय मिळवायला हवा! मोहाचा क्षण... रागाचा क्षण... मत्सराचा क्षण...! तुरुंगानं मला काही शिकवलं असेल तर हेच... माझी खात्री आहे.. २०१७ साली मी सुटून जेव्हा बाहेर येईन तेव्हा मोह, राग, मत्सरमुक्त असेन. आता मला दुस-याच्या अंगणात पारिजातकाचा सडा जरी पडला तरी त्याचा वास येणार नाही हे मात्र नक्की. माझं रुक्मिणीहरण नाटक, आता परत त्याचा दुसरा प्रयोग नाही.

दुःखहरण/४८