पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 पोलिसांनी अटक करून मला पनवेलच्या चौकीत नेलं... वाईट साईट बोलत राहिले... मी गप्प होतो... खून झालेल्या दुस-या क्षणी मी परत मनुष्यच झालो होतो. पण कुणाचाच विश्वास नव्हता... कोण पुढे यायला धजत नव्हतं. ना बाप ना भाऊ... मला त्या क्षणी गरज होती. कुणीतरी मला समजून घ्यावं... आपलं म्हणावं... पण सगळे मला सर्कशीतल्या सिंहाप्रमाणे बघत राहिले... पोलीस पण भीतच आत आले होते... कारण चाकू अजून हातात होता... खरं तर मी मूठ सोडू पाहात होतो... पण इतका एक्साईट होतो की सुटत नव्हता... माझं मलाच काही कळत नव्हतं...
 दुस-या दिवशी सकाळी १०.०० वाजता कोर्टात नेलं... मला न्यायालयीन कोठडी मिळाली... सगळं कबूल केलं होतं... कबूल होतं... न्यायाधीश चांगले वाटले... कुणी काही त्रास दिला का? मदत पाहिजे का? विचारलं... त्यांनी मला असं विचारावं याचं आश्चर्य वाटलं... मी मानेनेच नाही... नको... म्हटलं. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं काही वाटलं नाही... हां, पोलीस चौकीत जाऊ नये हे मात्र खरं! गुन्हा कबूल म्हटल्यावर तुच्छ का वागवावं! गुर्मी नाही... उद्धटपणा नाही... गुन्हेगार माणसासारखा वागला तर त्यांनी पण माणसासारखं नको का वागायला?
 दुपारी दोनला तुरुंगात गेलो... चौकी, न्यायालय अन् आता तुरुंग... चोवीस तासात तीन शॉक बसले.. हा तिसरा शॉक सिव्हियर... झटका होता... पोलीस गाडी, बेड्या... तो बुलंद दरवाजा... नोंद... कपडे बदलले. बंदी क्रमांक... पांढरा शर्ट... पांढरी चड्डी... पांढरी टोपी, त्यावर एक-एक काळी रेघ... सिंबॉलिक होती असं वाटलं... बरॅकमध्ये चोवीस तास उलटले नसतील... मी या परग्रहाचा एलियन होऊन गेलो... व्हावंच लागतं तुम्हाला. न होऊन कुणाला सांगतो?

 आता मी पॅवलॉवचा कुत्रा झालो होतो... मॉडर्न टाइम्समधला चार्ली... सारा खेळ शिवाजी म्हणतो... तसा. हळूहळू लक्षात येत गेलं... एक उंच भिंत, बरॅक, बंदिवास सोडला तर इथं सारं अलबेल असतं... टाइम टू टाइम... काट्याला काटा... जेवण मोजून... पाणी मोजून वापरायचं... संडासची गम्मतच... आतून कडी नाही... काही संडासांना दारच नाही... लाइट मात्र सगळीकडं... आत, बाहेर, व्हरांडा, अंगण, चार भिंतीबाहेर... हेऽऽ मोठे हॅलोजन. रोज दिवाळी, दसरा... भारनियमनाचा ठाव नाही...

दुःखहरण/४६