पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पिल्लाला चुऽऽचु करत चुचकारतात अन् त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. असं पाळीव, पराधीनपण होणं मला नको आहे. मी जो जसा असेन तसं तुम्ही मला स्वीकारायला हवं असं वाटतं... मी चूक केली हे खरं आहे... क्षणाची चूक अन् आयुष्यभर शिक्षा ही विषमता मला अमान्य आहे... मी सांगितलंय ना... हो, मी बायकोचा खून केलाय. माझ्याच आणि हैवान म्हणून नाही, माणूस म्हणून... खरं म्हणजे माणूस होतो म्हणूनच बायकोचा खून केला. तुम्ही सांगा ना मला. 'बायको' आणि 'मादी' मध्ये फरक आहे ना? मादीला योनिशुचिता नसते... तिला असते नुसती खाज... तिला नवरा नको असतो... हवा असतो नर... कोणीही! मी सुख देत असताना तिनं दस-याला वश व्हावं याचा मला राग आला... मी मनानं नसेन, शरीरानं मर्यादापुरुष होतो... तिनंही शरीरानं सावित्री असावं अशी माझी अपेक्षा होती... ती अहिल्या झाली... डोकं भडकलं... सपासप वार नाही करावे लागले... एका वारातच गेली... जाब, जबाब, पुरावे काही करायची गरज नव्हती... मी आतून, बाहेरून एक होतो... आहे. खरं म्हणजे मी नैतिकतेच्या आग्रहामुळेच गुन्हेगार ठरलो.

 चांगल्या घराण्यातली म्हणून तिला वरकड खर्च करून आणलं होतं... नोकरी, शेती सारं करत संसाराची कसरत करत होतो... माझ्याही जीवनात मोहाचे क्षण आले... नाही असे नाही... पण तिथंच तर माणसाची कसोटी असते ना? ती शेजारच्या विठ्ठलाच्या नादाला लागल्याचे मित्र सांगायचे... मी विश्वास नाही ठेवला... पुरुष स्त्रीशी बोलतो... स्त्रीनं पुरुषाशी बोलणं मी गैर मानायचो नाही... माझा विश्वास होता तिच्यावर... मी माझ्या नजरेनं जग बघायचो... मला वाटायचं... ते माझ्यासारखंच आहे... पण निराळं जग... निराळी माणसं बघितली नि माझं सटकलं... माझ्याच बिछान्यावर विठ्ठलला झोपलेलं पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ताकीद देऊन सोडलं... म्हटलं माणूस आहे... चुकणार... सुधारायची संधी द्यायला पाहिजे... माझ्यापुढे माझे गुरुजी होते. हायस्कूलला असताना मी वाहात निघालो होतो संगतीनं. फराकटे गुरुजी होते... कोल्हापूरचे... म्हटले होते... ‘सुभाना, अरे येशुदाचा नारे तू? बाप कुठं, तू कुठं? तो घाम गाळतो तुझ्यासाठी... हे काय सिगारेट फुकायचं वय? फुकायची तर आप कमाईवर... बाप कमाईवर नाही... त्या आगरी पोरांवर जाऊ नको... त्यांच्या जमिनीच्या तुकड्याला पण सोन्याचा भाव आहे. एमआयडीसी आल्यापासून तर स्वर्गातच आहेत ते. तुझा तुकडापण नाही... त्या दिवसांपासून मी कानाला

दुःखहरण/४४