पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


संबंधच ठेवत नाहीत... त्यांचे नि बहिणीचे संबंध आहेत. त्यांनी मला कामाला मोलकरीण म्हणून आणलंय... त्यांना जगाला दाखवायला बायको अन् कामाला हक्काची बाई हवी होती. माझ्यासमोर त्यांचं सारं चाललेलं असतं. मला सारखं टाकून बोलतात... घसरलेल्या पायाची... मी वाद करत नाही. सांगून बघितलं. दादांना सांगितलं तर गळा आवळीन म्हणून दम भरतात. अनेक गोष्टी तिनं बाईंना सांगितल्या. बाई तर फारच अस्वस्थ होत्या. मी विचार करून बिंदूच्या नव-याला बोलावणं पाठवलं. येतो म्हणायचा, पण टाळायचा. तिसरा निरोप मी निर्वाणीचा दिला तसा तो बिंदूला घेऊन आला. मुकाट्यानं उभा होता चोरासारखा. बस म्हटल्यावर अंग चोरून बळेनंच बसला.
 बिंदूचा नवरा अरविंद गुणी व कामसू होता; पण तो बहिणीच्या मुठीत होता. बहीण अविवाहित होती. चुलत भाऊ एकटा करून खातो म्हणून येऊन राहिलेली. अरविंदला विचारल्यावर सर्व सविस्तर सांगितलं... कबूल केलं. मी आणि बाईंनी त्याला समजावलं; पण माझ्या लक्षात आलं की, बहीण असेपर्यंत बिंदूची डाळ शिजणार नाही. मी दुस-या दिवशी बहिणीला घेऊन यायला सांगितलं. तसा तो गयावया करू लागला. मी पोलिसांत तक्रार देईन म्हटल्यावर तयार झाला. ठरल्याप्रमाणे दुस-या। दिवशी अरविंद बहिणीला घेऊन आला. आम्ही एकेकाला विश्वासात घेऊन ज्याचं माप त्याच्या पदरात टाकलं. शेवटी सर्वांना एकत्र घेऊन ठरलं की, बहिणीनं गावाकडं घरी जायचं नि परत यांच्या संसारात विष कालवायचं नाही. काही गडबड केली गावाकडे सर्व प्रताप येऊन सांगणार म्हटल्यावर ती निमूट तयार झाली. शिवाय बिंदू शासनाची मुलगी आहे. तिने तक्रार केली की तुरुंगात जायला लागणार म्हणून खोटेनाटं धमकावलं. ती मात्रा लागू पडली नि बहीण सरू गावाकडे गेली ती कायमचीच.

 बिंदूचा संसार अपेक्षेप्रमाणे सुरळीत सुरू झाला. अन् तिला मुलगा झाला; पण बिंदूचं रहाटगाडगं एवढ्यावर संपेल तर शप्पथ. बाळ होताच तिनं नव-याला सुख देणं बंद केलं. तसं अरविंद संस्थेच्या चकरा मारू लागला. बाईंना भेटला. एकदा मलाही. मी बाईंना बिंदूला समजून सांगा नि तिचं काय म्हणणं आहे बघून घ्यायला सांगितलं. बिंदूला दुसरं मूल नको होतं. ती ऑपरेशन करून घ्या किंवा माझं तरी करा म्हणून मागं होती. नवरा काही तयार नव्हता. त्याची दोन कारणे होती. तो सांगत होता त्याप्रमाणे त्यांच्यात पुरुष ऑपरेशन करत नाहीत... गावाकडे चिडवतात.

दुःखहरण/४०