पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सोनाराच्या मुलानं एक दिवस तिला चांगलं काम करते म्हणून पैंजण दिलं तशी ती हरखली; पण ती आईला खोटं सांगत राहायची. कामावरच्या मावशींनी दिलं. पाहुणे आले त्यांनी बक्षिसी दिली इ.
 सोनाराच्या कामावर तिचं घुटमळणं एव्हाना वाढलं होतं. दुकान उघडलं की बिंदू आत जायची. मालकही आत बाहेर घुटमळत राहायचा. दोघांचं संधान जुळलं. पाळी चुकली तशी आई जागी झाली अन् तिच्या चौकशीतून सारं पितळ उघडे पडलं. ज्या कामावर आई जायची तिथं हे लक्षात आल्यावर त्यापैकी एक डॉक्टर असलेल्या कुटुंबांनी आईला मदतीचा हात दिला. तिला मोकळं केलं. त्याच दरम्यान आमच्या आधारगृहाची माहिती गोव्यातल्या ‘सकाळ'मध्ये आली होती. डॉक्टरबाईंनी तिला समजावून देऊन चिठ्ठी देऊन आमच्याकडे पाठवलं.
 एका सुट्टीत गेलेली बिंदू तीन-चार महिने झाली तरी परतली नव्हती. परतली तेव्हा परत तिला दिवस गेलेले. तेही त्याच मुलाकडून समजल्यावर मात्र आम्ही तिला प्रवेश नाकारला. तशी आई ओकसाबोकशी रडू लागली. आईसाठी म्हणून तिला प्रवेश दिला; पण सुट्टी न मिळण्याच्या अटीवर. तशी बिंदू गप्प-गप्प राहू लागली. ती पहिल्याप्रमाणे पोट पाडायला काही तयार नव्हती. लाख समजावलं पण ऐकेना... मग संस्थेत रीतसर तिचं बाळंतपण झालं. तिला मुलगी झाली.
 मुलगी चिकू बालवाडीला जाऊ लागली तशी बिंदूला आम्ही समजावलं की उभं आयुष्य आहे. चिकूला दत्तक देऊ. तुझं लग्न करू. असं सुचवण्याचंही कारण होतं. संस्थेतलं तिचं वागणं आम्हाला संशयाचं, धोक्याचं वाटू लागलं होतं. योगायोगाने त्याच वेळी एक बिजराचं स्थळ चालून आलं होतं. तिची लग्नाची अट होती, आपल्या जातीपैकीच हवा. तेही जुळून आलं. योग्य स्थळी नि तेही आमच्याच संस्थेच्या गावी राहणार म्हणून आम्हीही जोर धरला. त्याचं कारण ती आमच्या सर्वांच्या नजरेत राहील.

 बिंदूचा संसार चांगला सुरू होता. नवरा केटरिंगचं काँटॅक्ट घ्यायचा. दोघं मिळून चांगला संसार करू लागली. घरी नव-याची चुलत बहीण लक्ष द्यायला होती. बिंदू अध्ये-मध्ये भेटायला यायची. तिच्या बाई, स्टाफ कोणीतरी जात येत राहायचं. खुशाली कळत राहायची. आज काय कपाट घेतलं, उद्या काय पंखा घेतला म्हणून सांगत यायची. दोन वर्षे झाली तरी घरात पाळणा हालला नाही म्हणून मी बाईंना विचारायला सांगितलं. बाईंनी विचारताच तिचा बांध फुटला... ‘तुम्ही दोनदा माझा घसरलेला पाय सावरला... उगीच तक्रार नको म्हणून सांगितलं नाही... हे माझ्याशी

दुःखहरण/३९