पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घसरलेला पाय सावरताना...


 बिंदू, तशी गोव्याकडची. आमच्या आधारगृहात आम्ही तिला दुस-यांदा प्रवेश दिला, तेव्हा तिची आईच तिला घेऊन आली होती. तेव्हा तिला दुसरा की तिसरा महिना लागला होता. त्यांच्या घरची गरिबी होती. वडील बिंदूच्या लहानपणीच वारले होते. हातावरचं पोट होतं. आई म्हापश्याजवळच्या वस्तीत राहात होती. किडूकमिडूक पडेल ते काम करायची. वडिलार्जित दोन-एक गुंठे जागा. जागेला लागूनच कुडाचं दोन आखणी घर. दोन गुंठ्ठ्यात रान कधी रिकामं नसायचं. आंबा, केळी, सुपारीची झाडंच जास्त. जागा पाणथळची होती. तिच्या शेताचं असं काम नसायचं. ती नि बिंदू मिळून शेजारच्या कॉलनीतील बंगल्याची केरवारा, भांडीकुंडी करायच्या. या व्यापात बिंदू कधी शाळेला गेलीच नाही. ती मोठी झाल्यावर चार पैसे अधिक मिळावे म्हणून तिला दोन घरांचं स्वतंत्र काम दिलं. मायलेकी मिळून येत जात. काम स्वतंत्र करीत.

 बिंदूू ज्या दोन घरी कामाला जायची तिथं शेजारी सोनाराचं दुकान होतं. सोनाराचा तरुण मुलगा ते चालवायचा. दोन खणाचं दुकान. आत कोठी (गोडाऊन) होतं. अन् बाहेर दुकान. बिंदूला त्यानं कामाबद्दल विचारलं तशी ती पैशाच्या आमिषानं हो म्हटली. हे काम धरलेलं तिनं मात्र आईला कळू दिलं नाही. कारण पगार झाला की, आई सगळा पगार काढून घ्यायची. तिला वयात आल्यामुळे नटावं-मुरडावं वाटायचं. चेन घे, डूल घे, मेंदी, नेलपेंट लाव, असं तिला वाटत राहायचं; पण सोय नव्हती. या वरच्या कामानं तिची सोय झाली नि ती अधिकच सुंदर दिसू लागली.

दुःखहरण/३८