पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोसलेच्या शिकवणुकीनं लांब लांब राहतो... त्याच्यासाठी संस्थेतली खोली सोडून तुम्हाला खोटं सांगून बाहेर घर घेतलं... कर्ज हाय अंगावर... मिळवायला लागलो की, पैसे देईन म्हणणारा रियाज... आता रमेश जाधव झालाय... म्हणतो कसा, तुम्ही कांबळे, मी जाधव. कसं दत्तक होणार... किती आशेनं पैका उधळला त्याच्यावर... वैरी उलटला... नासकं रक्त आपल्याच वाटेवर जाणार... मी त्यांना धीर दिला... समजावलं... रियाजला बोलावून समजावतो म्हणून सांगितलं. तसा त्यांना धीर आला.
 मी काही दिवस जाऊ दिले; पण मामा-मामीची उदासी वाढत राहिली... एक दिवस तर नोकरीच सोडून जातो म्हणाले, तसे मी रियाजला बोलवणं पाठवलं. अनेक निरोप देऊनही तो न आल्यानं मी स्वतः इन्स्टिट्यूटमध्ये गेलो... तो हबकला. त्याचे मालक देशपांडे माझ्या चांगलेच परिचयाचे होते... त्यांनी त्याला पार्टनर करून घेतलं, तेव्हा मी जामीन होतो....मागं एकदा त्याला कर्ज हवं होतं तेही मी आणि संस्थेतील एक शिक्षक जामीन होतो... या सर्व हक्कांनी मी त्याच्यापुढे उभा होतो... शर्मिंदा होता तो...
 नरमला... “दादा, मी संस्थेत येऊन उद्या भेटतो." म्हटल्यावर मी काही न बोलता परतलो.
 ठरल्याप्रमाणे तो दुस-या दिवशी आला... घडाघडा बोलू लागला. दादा, माझ्या पूर्वेतिहास तुम्हास माहीत आहे. तुमची काय नि माझी काय... एकच धडपड होती... ध्येय होते... मोठ्ठ व्हायचं. दादा, मी आता इतका मोठ्ठा, प्रतिष्ठित झालोय की, मला माझा इतिहास विसरायचा... पुसायचा आहे... माझं जग आता निराळं झालंय... चांगल्या घरातली स्थळे येतात. उलटं कसं चालायचं?

 रियाजचं हे तत्त्वज्ञान मला नवं नव्हतं... मागं एकदा असंच संस्थेत शिकून मोठ्या पदावर पोहोचलेल्या, लेफ्टनंट कर्नल झालेल्या मुलाला निरोप दिला होता... एकदा संस्थेत ये... मुलांसमोर बोल... मुलांना प्रेरणा मिळेल. त्यानं फोनवर मला समजावलं होतं, “शहाणा माणूस जखमेवरची खपली काढत नसतो... जुन्या आठवणी बळावलेल्या जखमेतील पूसारख्या असतात... पू पिळून टाकल्याशिवाय जखम भरत नाही... जखम बरी व्हायची तर खपली धरू देणं शहाणपणाचं.", मी उद्धटपणे विचारायचं ठरवून विचारलं नव्हतं... मनात आलं होतं. सांगावं, जखम बरी होते...

दुःखहरण/३६