पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वर्षभरात फॅक्टरीचं काम वर आलं होतं. धुराडंं, वर्कशॉप, गोडाऊन, शेड उभारणी होती. ट्रान्समीटर सुरू होऊन साईटवर वीज सुरू झाली होती. ढालेकाकांचं काम संपलं तरी तांड्यावर त्यांचं येणं-जाणं नित्याचं होतं. एकदा ते फिरून वसाहतीकडे परतले असतील. तेवढ्यात तांड्यावर मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज, गलका ऐकू आला. धावत येऊन पाहतात, तर खुमान विजेच्या खांबाला चिकटला होता. सारे लमाण काठीनं त्याला काढायचा प्रयत्न करत होते. ढाले काकांच्या प्रकार लक्षात येताच त्यांनी पळत जाऊन वीज बंद केली नि तांड्यावर आले. खुमान खाली पडला होता. तांड्यानं आकाशपाताळ एक केलं होतं. नंतर लक्षात आलं की, ठेकेदाराने रात्री आकडा टाकून वीज कनेक्शन रात्रपाळीसाठी ओढलं होतं, काम झाल्यावर आकडा काढायचा आळस केला नि होत्याचं नव्हतं झालं...
 आपल्या दुर्लक्षामुळंं खुमान गेला, असं ढाले काकांच्या मनानं घेतलं, तसं त्यांना जेवण गोड लागेनासं झालं. आपल्या विलास, विकाससारखा रियाज... तो अनाथ व्हावा याचं शल्य. त्यांना चैन पडेना... गाढवं ठेकेदाराच्या हवाली करून ते रियाजला घरी घेऊन आले... वसाहतीत एकटेच राहायचे. बि-हाड गावी असायचं... घासातला घास देत राहिले. त्याला शाळेत घातलं. वर्षही उलटलं नसेल. तांडा काम झाल्यानं गावाकडं परतला. जाताना ठेकेदार रियाजला न्यायला आला. ढालेकाकांनी दिला नाही. म्हणाले, 'मी खुमानला शब्द दिला होता... त्याला इंजिनिअर करायचं... एमएसईबीत लावायचं.' ठेकेदार निराश होऊन रिकाम्या हातांनी परतला. तो एका हक्काच्या वेठबिगारास मुकला होता.

 रियाज तिसरीत जाणार तेवढ्यात ढाले काकांची बदली गावाकडं झाली, तसा रियाजचा प्रश्न उभारला. घरची मंडळी तयार होईनात... रमेश असला तर ठीक होतं... रियाज..., कोण कुठला, शेजारीपाजारी, भावभावकीला काय उत्तर द्यायचं... ढालेकाका बेचैन होते... काय करायचं कळेना. तेवढ्यात कुणी तरी आमच्या संस्थेनं ‘अनिकेत निकेतन' हे अनाथाश्रम सुरू केल्याचं त्यांना सांगितलं. सारं ऐकून त्याचं नाव रियाज खुमान ढाले नोंदवलं. त्याची आठवण ठेवून ढालेकाका रियाज मोठ्ठा होऊन संस्था सोडेपर्यंत भेटायला येत राहायचे. सुट्टीवर, सणाला नेत राहायचे. तो त्यांचा तिसरा मुलगाच झाला होता.

दुःखहरण/३४