पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जखम बरी होते पण..


 फॅक्टरी साईटवर त्या वेळी मोठमोठी बांधकाम सुरू होती. ठेकेदारानं बीड, उस्मानाबादहून अनेक बिगारी मजुरांचे तांडे आणले होते. दगड फोडणारे, खणणारे, वाळूची वाहतूक करणारी गाढवं नि त्यांचे हाकारे. साईटवर लमाणांची खाशी वस्ती वसली होती. फॅक्टरी होणार म्हणून काही घरं, दुकानंही होऊ घातली होती. तिट्यावर वीज वितरण केंद्र आणि त्यांच्या कर्मचा-यांची वसाहत होती. पिकअप शेड, हॉटेल्स, दुकानं, टपच्या सा-यांचा तिट्यावर बाजारी असा माहोल होता. ढालेकाका वीज केंद्राच्या वसाहतीत राहात होते. दोन किलोमीटरवर असलेल्या लमाण वस्तीजवळ फॅक्टरीसाठी ट्रान्समीटर उभं करायची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते रोज तिट्ट्यावरून साईटवर ये-जा करायचे. त्यामुळे लमाणांशी त्यांची चांगलीच जान-पहचान झाली होती. गाढवांचा तांडा घेऊन आलेले रशीद मियाँ त्याचे दोस्त झाले होते. त्याचे एकमेव कारण तंबाखू-चुन्याचं दोघांचं समान व्यसन. या एका छोट्या गोष्टीनं हिंदू-मुस्लीम एकता घडवून आणली होती! या कुटुंबात परक्याला प्रवेश निषिद्ध असला तरी ढालेकाका थंडीत चक्क त्यांच्या चुलीवर हात शेकत बसायचे.

 त्या तांड्यात खुमान आपल्या इनमीन दोन गाढवांना घेऊन दगड, विटा वाळू वाहायचा, ते आपल्या एकुलत्या छोट्या रियाजसाठी. ढालेकाकांना म्हणायचा, ‘रियाज को पढायेंगे। साब बनायेंगे। बाप बनेगा बेटा दुनिया का।' एवढ्यावर खूश होऊन ढालेकाका त्याला चहा पेश करायचे. म्हणायचे, ‘इंजिनिअर बनायेंगे। एमएसईबी में लगायेंगे।

दुःखहरण/३३