पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हती... ती उद्योगघरात अन्य मुली-महिलांपेक्षा अधिक कमवायची व काटकसर करून पैसे साठवत राहायची... म्हणायची, मी स्वप्नीलला दादांसारखं शिकवणार, मोठं करणार...
 एक दिवस तिचं स्वप्न फळाला आलं... महेश पत्रकार झाला नि तिला घेऊन जायला आला... आम्ही त्यांचं रीतसर लग्न लावायचं ठरवलं... त्याची एकच अट होती... केसचा निकाल लागू दे... करू या... मी संस्थेच्या वकिलांशी बोललो, पोलिसांशी चर्चा केली... तिचं पुनर्वसन होणार असल्याचं समजावलं... मग संस्थेनं सुनंदाच्या बाजूनं अॅफिडेव्हिट घातलं... तिला प्रोबेशन अँड ऑफेंडर्स अॅक्ट लागू करावा असा रीतसर अर्ज पालक म्हणून दाखल केला. या कायद्यानुसार गुन्हा पहिलाच असेल, तर गुन्हेगाराला चूक सुधारायची संधी देण्याची तरतूद असते... त्याचा फायदा घेऊन सुनंदा निर्दोष झाली... न्यायाधीशांनापण आमच्या धडपडीचं कौतुक वाटत राहिलं होतं, हे त्यांच्या प्रश्नांवरून व नंतरच्या निकालपत्रावरून लक्षात आलं...
 तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, महेश आज सहाय्यक तहसीलदार आहे... स्वतःचा बंगला आहे... स्वप्नील कॉलेजला जायच्या तयारीत आहे... परवा सुनंदाला भेटायला गेलो होतो. गुरुजी आता निवृत्त आहेत... व्हरांड्यात ते डोलखुर्चीवर वर्तमानपत्र वाचताना पाहिले नि हा सारा सिनेमा लख्ख झाला. मनात आलं, खरा गुन्हेगार कोण? माणूस की समाज? समाज की वास्तव? काळ की प्रश्न ? तुम्ही जग जसे पाहाल तसे दिसते... जसे घडवाल तसे घडते... लागतो फक्त मनाचा मोकळेपणा... स्वीकार वृत्ती... सकारात्मकता! केल्याने होत आहे ते आधी केलेचि पाहिजे.

◼◼

दुःखहरण/३२