पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असल्याचं कळायला वेळ नाही... त्यांनी मामा, गुरुजी आणि सुनंदाला अटक केली... बाळ दिसताच सुनंदाला पान्हा आला... रडू कोसळलं... आईपणामुळे बिंग फुटलं नि अटक झाली... तपासात संस्थेचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी बाळाला व मुलाला आमच्या हवाली केलं... गुन्हा दाखल केला... मामा-वडिलांना जेलची हवा दाखविली.
 गुरुजींनी असं करावं याचा मला राग आला... मी त्यांची कानउघाडणी करायला म्हणून सबजेलला गेलो... ते अगोदरच मेल्याहून मेले झाले होते. मी न रागावता त्यांचं सारं ऐकलं तेव्हा त्यांना निरपराध ठरवून परतलो. मामा, गुरुजींना जामीन मिळेल, असं पाहिलं... त्यांची सुटका केली... ते नोकरीतून निलंबित होऊ नयेत म्हणूनही कुणाकुणाला भेटत राहिलो... अनाथ, निराधार, संकटग्रस्त मुले, मुली, महिलांचं काम करताना मी ते अपराधी असले तरी त्यांचा वकील होऊन जायचो. मला गुंता सोडवणं महत्त्वाचं वाटायचं... पाय घसरला म्हणून तो तोडायचा, हात काळोखला म्हणून कापायचा, हा सर्वसामान्य समाजाचा न्याय मला त्या वेळी अमान्य असायचा... अपराध गैरच... पण फाशी हा उपाय नाही... सुधारायला संधी या मताचा मी... तसा प्रयत्न करत राहायचो...
 या प्रकरणात मी माझा न्याय ठरवून टाकला होता. सुनंदा अजाणतेपणी फसली होती... समाजमन खोट्या प्रतिष्ठेच्या गर्तेत राहतं... जग बघितल्यामुळे असेन... कुमारीमातेस तिला तिचं बाळ घेऊन स्वाभिमानानं, स्वावलंबनानं राहता आलं पाहिजे, अशी माझी धारणा होती नि आहे... माझं हे तत्त्वज्ञान माझ्या भोगातून आलं होतं. सुनंदात मी माझी सोडून गेलेली आई शोधायचो... सुनंदाच्या बाळाचं... स्वप्नील नाव ठेवलं होतं आम्ही. त्यात मी माझ्या आयुष्याचं स्वप्नं... प्रतिबिंब पाहत राहायचो. या समाजात स्त्रीलाच वनवास... पुरुष बिनधास्त, निरपराध हे मला अमान्य होतं नि आजही आहे.

 त्याच काळात अशा मुलींच्या पुनर्वसन व स्वावलंबनासाठी टाटा ट्रस्टनी आम्हास मोठं अनुदान देऊ केलं होतं... आम्ही शिलाई, स्वेटर्सची मशिन्स खरेदी केली... आधारगृहातील सर्व मुली व महिला उत्साहानं काम करत राहिल्या... संस्थेत तीनशे मुलं-मुली होती. त्यांचे कपडे, स्वेटर्स, अन्य गरजेच्या वस्तू आमच्या उद्योगघरात तयार होत... सुनंदा स्वप्नीलला सांभाळत सारं करत राहायची. एव्हाना तिच्या हे लक्षात आलं होतं की, आपण स्वावलंबी झालो, तर महेश रुंजी घालेल... तिच्या कष्टाला तोड

दुःखहरण/३१