पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शाळा सुटली तशी सुनंदा घरी राहू लागली. होईतो स्वयंपाक, केरवारा करू लागली. गुरुजी दोन कोस ये-जा करत शाळा सांभाळायचे... आई शेत... पगार पुरायचा नाही... सावकारांच्या तगाद्यानं जीव मेटाकुटीला आला, तसा गुरुजींनी उपाय शोधला... शाळेतली, हुशार मुलं तालुक्याला शिकायला जायची... कोण हायस्कूलला, कोण स्कॉलरशिपला, कोण नवोदयच्या शिकवणीला... सर्व एकत्र खोली घेऊन राहायचे. जेवणाची आबाळ होत राहायची म्हणून जेवणाला बाई ठेवायची ठरली. तालुक्याच्याच ठिकाणची बाई ठेवली; पण मेळ काही बसेना. मग गुरुजींनी सुनंदालाच ठेवायची टूम काढली... स्वार्थ होता... महिना पाचशे मिळाले तरी एक हप्ता भागेल... गुरुजींचा शब्द गावात प्रमाण असायचा... एकदा बाजारचा दिवस गाठून गुरुजी, पालक तालुक्याला गेले. भांडी, स्टोव्ह, धान्य सर्व व्यवस्था केली. मुलीला शेजारच्या खोलीत ठेवलं... घरमालकिणीला लक्ष द्यायला सांगितलं नि निघून आले.
 हा क्रम गेली चार-पाच वर्षे बिनबोभाट पार पडत आला... सुनंदा सुट्टी, सणासाठी घरी येत-जात राहायची; पण तिला मुलांच्या जेवणाचा घोर लागलेला असायचा. तिची ओढ तालुक्याला असायची... कर्जही डोक्यावरून खांद्यावर येत राहिल्याने गुरुजी निश्चित होते... पोरीचं वळण, राहणं, भाषा सुधारून शहाणपण आल्यानं, समज आल्यानं आईपण हरखून गेली होती... पोरीला स्थळ मिळायला आता अडचण नव्हती.
 इकडे मे महिन्याच्या सुट्टीत मुलं अभ्यासाला, क्लासला, परीक्षेला म्हणून तालुक्यालाच मुक्काम करू लागली, तसं सुनंदाचं गावाकडे येणं कमी होऊ लागलं... एकदा मुलं परीक्षेसाठी म्हणून जिल्ह्याला आठ दिवसांसाठी गुरुजी व पालकांसह गेली; पण कॉलेजला जाणारा महेश... त्याला एकट्यालाच कसं ठेवायचं म्हणून सुनंदाला गावी न पाठवता सोबतीला ठेवलं... वयात आलेली दोन मुलं... आठ दिवसांत त्यांचं कसं सूत जमलं ते कुणाच्याच लक्षात आलं नाही.

 अन्य मुलांची शाळा दुपारची... महेशचं कॉलेज सकाळी... दुपारी सुनंदा नि महेशच खोलीवर असायचे... मालकीण म्हणणारी शेतावर जायची... सुनंदा-महेशला मोकळे रान मिळायचं... काही-काही प्रसंगांनी मालकिणीला संशय येऊ लागला... मुलांतही कुजबुज सुरू झाली... आणि या महिन्यात तर ती बाहेर बसलीच नाही... विटाळ आला नाही तसं मालकिणीनं घर अंगावर घेतलं... काय होणार हे सुनंदाच्या लक्षात आलं तशी ती भेदरली...

दुःखहरण/२९