पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खरा गुन्हेगार कोण?


 एके दिवशी सुनंदा स्वतःहून संस्थेत दाखल झाली. ती आली तेव्हा पोरगीशीच होती... दिवस गेले होते; पण पोट फारसं दिसत नव्हतं... भेदरलेली होती... विरलेलं लुगडे नेसलेली... हडकुळी इतकी की लुगडंही ओझं वाटावं... ठेंगणी, ठुसकी... आली तेव्हा केस पिंजारलेले... लालमातीनं माखलेले... आठ दिवस अंगाला पाणी लागलेलं नसावं... पोटातही अन्नाचा कण गेला नसावा.
 नुसतं पाहूनच काही गोष्टी एव्हाना आमच्या लक्षात यायच्या मावशी, ताईंना मी सूचना दिल्या नि अन्य कामात राहिलो. आठ दिवसांनी सुनंदाचा चेहरा उजळलेला पाहिला तेव्हा बरं वाटलं. दरम्यान बाईंकडून मला समजलं होतं...

 सुनंदाची घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील प्राथमिक शिक्षक होते; पण घरावर कर्जाचा डोंगर होता. गुरुजी धनगर वाड्यावरील शाळेत शिक्षक होते. पदरात दोन मुली. दुस-यांदा सुनंदा जन्मली तेव्हा गुरुजींनी तिच्या जन्मापासूनच उजवण्याचा घोर लागला. कर्जामुळे घरात सतत चिडचिड होत राहायची. सुनंदाची आई गावात मास्तरीण बाई म्हणून मानकरी होती; पण दिवस फिरले तसे त्या पण शेतावर जाऊ लागल्या. मुली शाळेच्या वयात शाळेत जाऊ लागल्या. सुनंदा मात्र आईचं शेंडेफळ... शेपूट... शाळेला नुसतं जायचं म्हटलं तरी भोंगा पसरायची... गुरुजीची पोर म्हणून चौथीपर्यंत ढकलत नेली खरी; पण पुढंं गाडंं अडलं ते कायमचं.

दुःखहरण/२८