पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमीराच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू लागतात...


 ही १९८५ मधील गोष्ट असावी. डहाणू-कोसबाड परिसरातील एका पाड्यावर एक कातकरी कुटुंब राहात होतं. ते शेतमजूर होतं. हातावरचं पोट होतं त्यांचं. एकू व जमीराचं लग्न होऊन चार-पाच वर्षं झाली होती. पदरात दोन पोरी होत्या. वीरा व मीरा, वीरा पाच वर्षांची तर मीरा तीन. एकू मेहनती होता. गावात दोघा-तिघांची शेती एकटा सांभाळायचा. मोठा कष्टाळू होता एकू. मुलींना शिकवायचं नि मोठं करायचं स्वप्न, त्याला मालकांच्या मुलांना रोज शाळेत पोहोचवत असताना पडलं नि तो दुप्पट कष्ट करू लागला. जमीराला त्यानं हे सांगितलं तेव्हा तीही हरखून गेली. म्हणाली, “आपण गुलामीचं जिणं जगतो. पोरी तर मालकिणी होतील." एकू म्हणाला, “आपण म्हमईला जाऊ या. तिथं वसईला एक वकील हायाती. त्यांनी शेती घेतलीया. त्यांना सालदार कुटुंब हवंया. इथल्या परीस पैकं मिळतील, पोरींना सिक्षान भेटंल, पैकं बी अन् शानपन बी!" जमीराला कल्पना भावली. तिनं हिय्या केला. रोज एकूमागं घोर लावला. “वकिलाला सांगावा धाडा. आपण म्हमईला जाऊ या."

 आज-उद्या करत एकदाचा दिवस उजाडला नि एकूनं आपला मुक्काम हलवून वसई गाठली. वकिलाची मोठी शेती होती. केळीची बाग, नारळ बाग, भात-शेती, वडिलार्जित शेतीपण त्यांनी वकिलीच्या पैशातून वाढविली होती. अशी दोन कुटुंब त्यांनी यापूर्वीच वस्तीला आणली होती. वाढत्या पसाऱ्यामुळे त्यांनी आपल्या अशिलाकरवी एकूशी संधान बांधलं होतं.

दुःखहरण/२३