पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी रात्री टॅक्सीनं पांढरेवाडी गाठली. सरळ पोलीस स्टेशनवरच गेलो. इन्स्पेक्टरांनी विश्वनाथ पांढरेचा जबाब मला वाचायला दिला. तो माणुसकीला काळिमा फासणारा तर होताच. शिवाय विश्वास, नातं, सभ्यता साच्या शब्दांना मुळातून उपटून टाकणारा होता... विश्वनाथ पांढरे यानं आपल्या मुलीवर बलात्कार केला होता. कारण एकच, संशय! त्यांना बायकोचा संशय येऊ लागल्यापासून त्यांच्या मनानं एकच घेतलं होतं की, संध्या आपली नाही. संध्याच्या आईच्या खुनानंतर त्यांच्या मनानं एकच हिय्या केला होता... बायकोला संपवलं... तिच्या प्रियकराला पण संपवायचं... पण धाडस होईना... मग मनावर घेतलं... मूल आपलं नाही... नासवायचं...
 आम्ही संध्याला समजावून घेऊन आलो. पांढरे परत जेलमध्ये गेले. त्यांच्यावर आणखी एक केस दाखल झाली... आता त्याचं उर्वरित आयुष्य कारागृहात जाणार ही काळ्या दगडावरची रेघ होती; पण आमच्यापुढे संध्याचं उभं आयुष्य होतं.
 पुढे पाच-सात वर्ष संध्याला सांभाळणं, समजावणं अशक्यप्राय होतं. आम्ही एक ठरवून टाकलं होतं... तिचा भूतकाळ जागा होईल, असं कुणी काही बोलायचं नाही. काही दिवसांनी ती नॉर्मल झाल्याचं हाती आलेल्या तिच्या एका प्रेमपत्रानं समजलं... मी पालक म्हणून निश्चित झालो. डोक्यावर बर्फ ठेवून तिच्यावर अक्षता उधळल्या तो क्षण आमच्या सर्वांच्या मनावरील मणामणाचं ओझं उतरवणारा होता... त्यापूर्वी पालक म्हणून आम्ही एकच काळजी घेतली होती की, वडील असलेल्या जेलमध्ये वा पांढरेवाडीत याचा मागमूस लागणार नाही. संस्थेतल्या मुलीचं लग्न उजळमाथ्यानं, डामडौलात करण्याची आमची परंपरा; पण संध्याचं लग्न आम्ही भूमिगत राहून केलं.
 दुस-या जगात काहीच निश्चित असत नाही... निश्चित एकच असतं... परिस्थिती कितीही आकाश फाडणारी असो... आकाशालाही टाका घालण्याची शक्ती, शक्यता सतत एकवटत राहायच्या... ते पुन्हा फाटणार आहे, हे गृहीत धरूनच!

◼◼

दुःखहरण/२२