पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कारण आम्ही तिचे पूर्ण पालक झालो होतो. तीही समजदार होऊन संस्थेची झाली होती.
 नेहमीप्रमाणे मी संस्थेच्या कामासाठी म्हणून बाहेर पडायला स्कूटरची कीक मारत होतो तर पांढरे समोर उभे! मला क्षणभर खरंच वाटलं नाही. त्यांनी नमस्कार केला. मी विचारलं, “सुटला का पांढरे?"
 म्हणाले, “एवढ्या लवकर सुटका होती का दादा? अजून तीन वर्षं हयाती? मग आलात कसे? पळून?"
 पांढरे : (कान धरून) “कसं पळून येईन? पॅरोलवर सुटून आलोय... महिनाभराचा पॅरोल मिळालाय. मुलीला सुट्टीवर न्यायचं म्हणून आलोय."
 जन्मदात्याची पोरीवरची माया बघून आम्ही सर्वच नेहमी म्हणायचो, आईनं चूक केली. शिक्षा निष्पाप पोरीला. आई-वडील असून संध्या अनाथ, निराधार झाली होती. बापाची माया बघून आम्ही संध्याला सुट्टीवर पाठवायची परवानगी दिली. आमच्या अधीक्षकांनी कारागृह अधीक्षकांचा पांढरेच्या सद्वर्तनाचा अहवाल घेतला आणि संध्याला रजेवर पाठवलं. आम्ही सर्व, संध्याही घरी जायला मिळणार म्हणून खुशीत होती... हरखली होती. बाबांनी तिच्यासाठी नवे कपडे, खाऊ मैत्रिणींना चॉकलेट्स आणली होती.

 ... संध्या जाऊन दोन दिवसही झाले नाहीतर पांढरेवाडीहूून फोन आला, 'मी पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, 'संध्याला घेऊन जाण्यासाठी ताबडतोब निघून या. इथं आल्यावर सविस्तर बोलू...' काही विचारण्यापूर्वीच त्यांनी फोन ठेवल्याने जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. संध्याच्या संस्थेच्या म्हणजे कन्या बालगृहाच्या अधीक्षिका या विचित्र फोनमुळे एकट्या जायला तयार होईनात. मग सोबतीला आम्ही एक पुरुष अधिकारी, एक महिला काळजीवाहक अशी विशेष बाब म्हणून योजना करून पाठविली व पोहोचताच फोन करायला सांगितले. मी घरी निघून गेलो; पण बेचैन होतो. सतत फोनची घंटी वाजली की मनात पाल चुकचुकायची, असं काही झालं की, काहीच सुचायचं नाही. त्या दिवशी दुपारचं जेवण घेणंही जिवावर आलं. चाळा म्हणून वाचत, पानं चाळत राहिलो. सायंकाळी पाचला पांढरेवाडीहून अधीक्षकांचा फोन आला, “सर, तुम्ही टॅक्सी करून निघून या. संध्या तुम्ही आल्याशिवाय येईल असं वाटत नाही नि तिला तसं आणणंही बरं नाही."

दुःखहरण/२१