पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणूसपणाचा चेहरा बहाल करू शकलो नाही. आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्राचे अधिकारी, हक्कदार होऊ न शकलेली ही माणसं... त्यांना तुम्ही कोणत्या आधारे भारतीय नागरिक ठरवणार? ज्यांना काहीच नाही त्यांना सर्वकाही' हाच खरा सामाजिक न्याय नाही का? जात, धर्म, वंश समाजात दच्या निर्माण करतात, समाज उतरंड तयार करतात. त्यापेक्षा सामाजिक स्थितीच्या आधारावर वंचितांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याची सकारात्मक सामाजिक न्यायाची वाट धरणार की आरक्षणाद्वारे विषमता निरंतर ठेवत मतांची राजकीय बांधणी करत राहणार? दलित, स्त्रिया, वंचित, उपेक्षित सारेच समान गरजू समजून त्यांना माणूस बनवण्याचा कार्यक्रम जोवर आपण हाती घेणार नाही तोवर समाज एकसंध होणार तरी कसा नि केव्हा? जात, धर्मनिरपेक्ष विकासच देशास पुरोगामी बनवू शकतो हे केव्हा तरी छोट्या-छोट्या स्वार्थापलीकडे जाऊन आपण समजून घेऊन कृतिकार्यक्रम ठरवायला नको का?
 ‘दुःखहरण'मधील वंचितांच्या वेदना समाजास जोवर विकल करणार नाहीत तोवर हा समाज संवेदी आहे असं मानणं म्हणजे फसगत करून घेणं आहे. यातला रियाज आमिषाला बळी पडतो त्याचं कारण दारिद्र्य नि संधीचा अभाव, जमीरा पोटच्या गोळ्यांना मुकते ती शिक्षण न मिळाल्यानं. सुनंदा नि महेश पोटचं पोर घाटात टाकतात ते समाज त्यांचं खरं प्रेम स्वीकारत नाही म्हणून नि समाजाच्या जात, पात, प्रतिष्ठा, नैतिकतेच्या भ्रामक कल्पनांमुळे. समाजाचे खरे गुन्हेगार माणसं नसून बुरसटलेले विचार व परंपरा होत, हे आपण केव्हा गळी उतरवणार? घसरलेला पाय सावरावा म्हणून प्रयत्न करणारी बिंदू... झाकल्या कोंबड्यांचा चोरटा रोमान्स वैध नात्याची ढाल किती दिवस सहन करणार? तेच ‘रुक्मिणीहरण' मधील तुकारामाचं? लैंगिक उद्गार नैसर्गिक! त्यांना नैतिकतेच्या भिंती थोपवू शकत नाहीत हे पुराण कथांपासून सिद्ध झालं तरी आपण हेका नाही सोडणार! प्रकट नि चोरट्या शरीरसंबंधाबाबत तुम्ही जितक्या लवकर युरोपसारखे उदार व्हाल तितक्या लवकर घरा-घरांतील ‘कुमारसंभव' कमी होतील. हे आपण अभिनिवेश, अहंकार, मानभावीपणा सोडून वस्तुनिष्ठ पद्धतीनं पाहणं यातच समाजशास्त्रीयता नाही का? समाजातलं अनौरस होणं, कुमारी माता होणं थांबायला नको का? ते सामाजिक प्रागतिकतेशिवाय कसं शक्य आहे? लिंगभावच तृतीय पंथ निर्माण करतो ना? स्त्री-पुरुष भेदापलीकडचा माणूस समाज हेच त्याचं उत्तर नाही का? अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर मुलांना आपण अजून किती वर्ष छळत राहणार ?