पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यावर वडिलांनी ओढाताणीस कंटाळून बि-हाड मुंबईला हलवलं. दरम्यान, अन्य दोन मोठ्या मुलींची लग्नं उरकून जनार्दनपंत मोकळे झाले होते. वडिलांनी येसूला शाळेत घातलं. आई घर सांभाळायची. बायकोमुलांत रमल्यानं जनार्दनपंतांना कष्टाचं काही वाटायचं नाही. सोबत त्यांचा एक भाऊ स्टेशनमास्तर होता. तोही बदलून मुंबईस आला. दोघांना एकमेकांची मदत होत राहायची. जाणं-येणं होतं; पण संसाराची जबाबदारी ज्याच्या त्याच्याकडे होती. सगळं सुखानं चाललं असताना एक दिवस येसूचे वडील अचानक वारले अन् आकाशच कोसळलं. नोकरी गेली तसा वखारीचा आधार, आसरा गेला. दिरानं असमर्थता दाखवली म्हणून आई येसूला घेऊन परत कोकणात आली.
 कोकणात येऊन वर्ष उलटलं असेल नसेल, मुंबईचे स्टेशनमास्तर काका गावी आले ते येसूसाठी स्थळ घेऊनच. त्यांचा एक भाचा होता. व्यंकटेश बापट त्याचं नाव. तो मुंबई पोलिसात सी.आय.डी. होता. इतकं चांगलं स्थळ कोकणातल्या मुलीला चालून येणं म्हणजे आईचा जीव भांड्यात पडणंच होतं. आईनं होकार देताच येसूबाई सौ. शांताबाई व्यंकटेश बापट झाली. नवव्याच्या सतत बदल्या होत राहायच्या. त्यामुळे पेण, पनवेल, कुलाबा इथं बि-हाड थाटत संसार फुलत होता. वर्षा-दोन वर्षांच्या अंतरानं शैला, मंगल, प्रकाश जन्मले. या मुलांचे वडील व्यंकटेश बापट मोठे कामसू होते. मुलांवर जिवापाड प्रेम होतं. तब्येतीची किरकोळ तक्रार असायची. पोट सारखं दुखायचं, म्हणून अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं तसे ते जास्तच थकू लागले. अठरा वर्षे नोकरी झाली. झेपेना म्हणून पोलीस नोकरीचा राजीनामा दिला. रक्त वाढेना, अॅनिमिया झाला, अन् त्यातच ते दगावले, ते १९५५ साल होतं.

 ऐन तारुण्यात वैधव्य... पदरात तीन मुलं... मुंबईसारख्या ठिकाणी राहणं अवघड. मालक गेले; पण कळवूनही साधं भेटायला कोणी आलं नाही. त्या वेळी त्या आपल्या कुटुंबासह सांगली असलेल्या दिराकडे हवापालट म्हणून येऊन राहिल्या होत्या. पतींना मुंबईची हवा मानवत नव्हती हे खरं होतं; पण इथलीही हवा अंगाला लागली नाही. ते सारखं विचारात असायचे. तीन मुलांचं काय होणार? संसार कसा ओढायचा? अन् एक दिवस काळजीनंच त्यांना ओढून नेलं. तेव्हा बापटांचं कुटुंब सांगलीला एका वाड्यात होतं. शेजारी सोहनींचं कुटुंब राहात होतं. ते चांगले गृहस्थ होते. बापटबाई धुणी-भांडी करून तीन मुलांचा संसार ओढताना ते रोज पाहायचे. त्या वेळी सातवी पास स्त्री म्हणजे सुशिक्षितच

दुःखहरण/१२५