पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुढे वेगवेगळ्या निमित्ताने त्यांच्या घरी येणं-जाणं होत राहिलं. कधी सणावाराला जेवायला, आजारी पडलो की औषधाला, रक्षाबंधनला अशी घरगुती निमित्तं असायची; पण जाणं-येणं सहज होत राहायचं. हा क्रम सन १९६७ ला सुरू झालेला. तो मी सन १९७१ ला गारगोटीतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडेपर्यंत तर राहिलाच; पण आजअखेर ते ऋणानुबंध पहिल्यासारखेच अन् खरं तर अधिक दृढ होत राहिले आहेत. शैला, मंगल, प्रकाश यांची लग्नं, त्यांच्या मुलांची बारशी, शिक्षण, परत मुला-मुलींच्या मुलांशी लग्न अशा निमित्तानी उभय घरात जाणे-येणं नित्याचं होऊन गेलंय. मी गारगोटीस व्याख्यान इ. निमित्तानं वरचेवर जात असतो; पण त्यांच्या घरी न जाता गारगोटी सोडली, असं कधी घडलं नाही.
 बापटबाई हे गारगोटीतलं त्यांचं परिचित नाव. तेच नाव माझ्या ओठी. घरी प्रकाश, शैला, मंगलची आई असल्या तरी माझ्यासाठीही त्या ‘आईच होत्या नि आहेत. गेल्या ५० वर्षांतील त्यांचे जीवन, जगणं, संघर्ष माझ्यासमोर आहे. माझ्यासाठी त्या पुरुषार्थी आई' म्हणून नेहमीच प्रेरक राहिल्या आहेत. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा आजच्यासारखा स्त्रीधार्जिणा नव्हता. उलटपक्षी त्या दिवसांत स्त्रीचं एकटं असणं, राहणं, जगणं म्हणजे पुरुषांना डोळा वाकडा करायची संधी, हात टाकायचं निमित्त नि पाय घसरायचा बहाणा असायचा. समाज हे गृहीतच धरायचा. बाई विधवा आहे, एकटी आहे, फिरते मग असं होणारच. अशा काळात खांद्यावरचा पदर ढळू नये म्हणून समाजधुरीणांना धरून राहायचं शहाणपण बापटबाईंकडे होतं, म्हणून गारगोटीसारख्या आडगावात आडोसा शोधत स्वतःचं बस्तान त्या बसवू शकल्या. तो काळ पाहता हे सोपं नव्हतं. त्यांचं शहाणपण, व्यवहार, कष्टच कमी आले अन् आला दिवस निघून गेला.

 आज मी मागे वळून त्यांचे पूर्वजीवन आठवायला लागतो. ते पाहून खरंच वाटत नाही का, हा गतकाळ त्यांचाच होता! तसं त्या मुळात येसूबाई गोखले. दोन मुलींच्या पाठीवर सन १९३२ ला त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव जनार्दन, आईचं रुक्मिणी. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातलं तळेखाजण हे त्यांचं मूळ गाव. वडील मूळचे शेतकरी; पण शेतात कुळ होती. कुळकायद्यात सारी शेती गेली. अन् दोन वेळची भाकरीही मुश्कील झाली. म्हणून मग वडील नशीब काढायला म्हणून मुंबईत गेले. शिक्षण नसल्यानं गिरगावच्या पानाच्या वखारीत त्यांना हरकाम्याची नोकरी करावी लागली. तोवर येसूबाई आईसह तळेखाजणमध्येच शिकत कसे तरी दिवस घालवत होत्या. चौथी पास

दुःखहरण/१२४