पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषार्थी आई


 सन १९६७ ची गोष्ट असावी. मी एस.एस.सी. पास झालो होतो. पुढील शिक्षणासाठी मी मौनी विद्यापीठ, गारगोटी येथे आलो होतो. येऊन पाच-सहा महिने झाले असतील. मी कॉलेज करून ग्रंथालयाकडे जात होतो. वाटेत शाहू कुमार भवन हायस्कूल लागायचं. ते सुटलं होतं. मुलं घरी जात होती. घोळक्यानी शाळकरी मुली परतत होत्या. त्यात आमच्या आश्रमातील शैला बापट या मुलीला मी पाहिलं नि चक्रावून गेलो. ही इथं कशी? हाक मारली तर तिलाही आश्चर्य वाटलं. मी आईकडे आले आहे. आईनं माझी मुदत संपली म्हणून सोडवून आणलंय. मंगल अजून पंढरपूरच्या बालकाश्रमातच आहे. इथं मी, आई अन् लहान भाऊ प्रकाश सर्व जण मिळून राहतो. खोपड्यांच्या माडीवर घर आहे. आई डॉ. पंडितांकडे नर्स आहे, असं सारं एका दमात सांगून शैला मोकळी झाली. “घरी ये... मी आईची ओळख करून देते." म्हणून निघून गेली.

 या घटनेलाही महिना-दोन महिने झाले असतील. एकदा नदीकडे फिरायला जात असताना शैला आणि तिची आई वाटेतच भेटल्या नि बळेच मला घरी घेऊन गेल्या. शैलाच्या आईची नि माझी ती पहिली भेट असली, तरी त्यांना मी माझ्या लहानपणापासून पाहात आलो होतो. मला सांभाळणारी माझी आईपण त्यांच्यासारखीच नर्स असल्यानं त्या माझ्या आईला ओळखायच्या. पहिल्या भेटीत शैलाच्या आईनं जे आगत-स्वागत केलं, जे अगत्य दाखवलं, आपलेपणा व्यक्त केला त्यातून गारगोटीसारख्या परक्या ठिकाणी मला हक्काचं घर मिळाल्याचा आनंद झाला.

दुःखहरण/१२३