पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


उद्यमनगरात भाड्याची खाली घेऊन कायमचं बि-हाड केलं. हे मिलिटरीत निघून गेल्यावर निराधार वाटायचं. घरमालकीण, शेजारी चांगले होते. मदत करायचे. नाही म्हणायला पंढरपूरच्या आश्रमातील चार-पाच मुलं उद्यमनगरात नोकरी करायची. येऊन-जाऊन असायची. अडचणीला धावून यायची. मुलांच्या बाळंतपणात फार सोसावं लागलं. कुणी करणारं नसायचं. घरी मूल नि मी दवाखान्यात. मूल बेवारशी ठेवणं पटायचं नाही. मी दवाखान्यातून यायची. सारं करत राहायची. त्या वेळी अंगावर काढलेली दुखणी आज भोगतेय. त्या वेळी सतत वाटायचं की आपलं कोणीतरी असायला हवं.
 पहिल्यांदा मी परस्वाधीन होते. पतीच्या मर्जीवरच जगायला, नाचायला लागायचं. नंतर मुलं मोठी झाल्यानंतर मला नोकरी लागली. तीही संस्थेच्याच महिलाश्रमामध्ये. ज्याची आवड होती तेच पदरात पडल्यामुळे दुःखात व कष्टात दिवस काढल्यानं सुखाचा सुस्कारा टाकला. गाडी रूळावर येऊ लागली तोच मुलीचं लग्न ठरलं व नोकरी सोडली. पुन्हा पूर्वीचे दिवस आठवू लागले. दिवसभर काबाडकष्ट करायचे. आठवणींनी अंथरूणावर डोळ्यातून टिपं टाकत कधी झोप लागून जायची हे कळायचं नाही. काही काळ लोटला तोच पुन्हा नोकरी मिळाली. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात. माझ्या लहानपणीची पुन्हा आठवण झाली. ती जिथं जे तीन दिवसांचं बाळ (दीपावलीच्या दिवशी) सापडलं ती मुलगी होती. म्हणून तिचं नाव आम्ही दीपा ठेवलं. तिची अवस्था इतकी वाईट होती, आता आहे तर आता नाही अशी. त्या अर्भकावर इतका जीव बसला की घरात। माझ्या कोण कोण आहे, याची आठवणदेखील राहात नसे. नंतर तिचं कोडकौतुक.

 आज आम्ही उभयता वृद्धत्वाकडे झुकलो आहोत. मुलगा आहे; पण त्याचे प्रश्न आहेत. आम्ही दोघंच एकमेकांचे आधार. मतभेद असूनही आमच्यात काही अंतर आणू दिलं नाही. हे नेहमी वृद्धाश्रमात जायची भाषा करतात. वाटतं, सारं आयुष्य आश्रमात घातलं, आता उत्तरायुष्य नको. म्हणून माझा विरोध आहे.

दुःखहरण/१२२