पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संसार करीत आहे. भाऊ पुण्यास व जुन्नरला होते, त्यांना आणलं. आज ते आपल्या पायावर उभे आहेत. मोठा भाऊ स्वतःची रिक्षा चालवतोय. छोटा शिकतोय. त्याला त्यांच्या पायावर उभं केलं की, माझ्या संसाराची जबाबदारी संपली.
 मी व माझी भावंडे अशी स्वावलंबी झाल्याचे पाहून एकदा मामा दत्त म्हणून उभा राहिला. घरी चल म्हणाला; पण आम्ही मात्र गेलो नाही. इतक्या वर्षांनंतर त्याच्या ओळख देण्याचा हेतू न कळण्याइतके आम्ही आता लहान नव्हते.
 जबाबदारी संपली तशी माझ्या लग्नाविषयी विचारणा होऊ लागली. मी खोली घेऊन राहात होते तिथे पुरवठा खात्यातील एक अधिकारी शेजारी राहायचे. त्यांनी प्रदीप नलवडेंचे स्थळ आणले नि फारसा पुढचा मागचा विचार न करता, चौकशी न करता मी लग्न केले.
 लग्नाच्या दुस-या दिवशी कळलं, मी ज्यांच्याशी लग्न केलं ते त्यांचं दुसरं लग्न आहे. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी चौकशी न करता, संस्थेतील कुणाचा सल्ला न घेता हे केल्याने पश्चात्ताप करण्यात अर्थ नव्हता. माझं आभाळ मला पेलायचं होतं ना! अनाथांचं आभाळही अनाथ असतं कळलं नि मी मला सावरलं. निभावून न्यायचं ठरवून मी दिवस काढू लागले. मला अजिंक्य झाला नि जग जिंकल्याचा आनंद झाला. आता या वयात आपलं हक्काचं कोणी तरी आहे हा मोठा आधार वाटू लागला.
 हे दोन्ही घरात येऊन जाऊन राहतात. मला अजिंक्य झाल्यावर पहिलीला दिवस गेले. यांनी माझ्याशी लग्न केलं ते पहिलीला दिवस जात नव्हते म्हणून; पण माझ्या पायगुणांनी तिला दिवस गेल्याची यांची धारणा असल्याने त्यांनी मला आजवर कधी अंतर दिले नाही. कधी ते घरी येणार नसले की वाटते...

 माझ्या कितीतरी आश्रम भगिनींची होणारी परवड पाहिली की वाटतं, आपल्या साच्या दुःखांसह आपण खरंच सुखी आहोत. या जाणिवेमुळेच त्यांना साहाय्य करण्याची शक्ती माझ्यात येते.

दुःखहरण/११५