पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोंडीची कोंडी


 पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात सन १९५० ते १९६५ या काळात बाबासाहेब जव्हेरी व त्यांच्या पत्नी मंजुताई ज्यांना आम्ही आश्रमातील सर्व ‘आई-बाबा' म्हणत असू, त्यांनी आश्रम अक्षरशः ‘घर बनवला होता. त्या आश्रमातून मी वयाच्या ९ व्या वर्षी सन १९५९ ला कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये शिकण्यासाठी आलो तरी दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही इथं आलेली आठ मुलं पंढरपुरी जात असू. सुट्टीची किती कित्ती वाट पाहात असायचो आम्ही! आम्ही मुलं सुट्टीसाठी आश्रमात आलो की, पाय ठेवताच सारा आश्रम चैतन्यमय होऊन जायचा. मुलं-मुली मिळून कॅरम, पत्ते, सिनेमा, क्रिकेट, वाचन इ. ची एकच धमाल असायची. त्याशिवाय कबड्डी, खो-खो, लपंडाव, लंगडी, जिबली, दोरीवरच्या उड्या, गलोरी, व्यापार, सायकल, गजगे खेळलो नाही, असा खेळ नसायचा.

 या खेळात कोंडीताई कबड्डी, खो-खोमध्ये आघाडीवर असायची. पदर खोचून खेळणं, शिवणं, लंगडी घालणं यात तिचा हात आणि पायही कोणी धरू शकायचा नाही. कोंडीताई खेळात आली की रंगत भरायची. ती ज्या पार्टीत ती पार्टी जिंकली म्हणून समजा. ताईचा तो ओसंडता उत्साह मला आजही चकित करतो. एकदा असाच सुट्टीवर गेलो असताना समजलं की, कोंडीताईचं लग्न ठरलंय नि तिला कोल्हापूरला दिलंय. तिला नि आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू?

दुःखहरण/१०९