पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तिस-या दिवशी पोलिस कालिदासच्या आईला घेऊन दत्त. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून त्या बापडीनं पोर सांभाळणं कठीण म्हणून देवीच्या हवाली केलं होतं. त्या आई आल्या; पण हे मूल माझं नाहीच म्हणून बसल्या. मुलाला सोडून दीड-दोन वर्ष होत आलेली. सोडताना तो आंधळा, मुका, लोळा-गोळा. आत्ताचा मुलगा दिसणारा, चालणारा, बोलणारा... आता आली का पंचायत, ‘सूरदास'चा ‘कालिदास' असा कायाकल्प करण्याची किमया वाटणाच्या आमच्या सर्वांपुढे एक नवाच प्रश्न उभा होता. मेवेकरांची ओळख परेड झाली. बाईंची ओळख पटली; पण आईला मूल आपलं वाटेना. आम्ही प्रयत्न करत होतो; पण यश येत नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून आईला म्हटलं, मुलाला काय हाक मारायची तशी मारून तर बघ, तशी ती खेकसली, ‘अय अप्पाएऽऽ' तसा कालिदासनं हंबरडा फोडला... आऊ एऽऽ' अन् तिची खात्री पटली. कालिदासला दिसत नव्हतं... बोलता येत नव्हतं; पण ऐकू यायचं. त्याच्या बालस्मरणातील आऊच्या स्मृतीची गाज त्याच्या मना-कानात भरून होती. ती आप्पाचे पटापट मुके घेऊ लागली. कुरवाळू लागली. मायेनं बोटं मोडू लागली... कन्नडमध्ये म्हणती झाली, ‘‘पोर असं होणार माहीत असतं, तर मीच सगळं केलं असतं... भांडी-कुंडी विकून केलं असतं." ती म्हणत होती त्यात तथ्य होतं... प्रामाणिकपणा होता... होतं परिस्थितीचं प्रखर वास्तव. अप्पाला तिनं ताब्यात घेतलं. मी पोलिसांना म्हटलं तिला शिक्षा नका करू. त्यांनी तिचे, आमचे जबाब घेतले व केस बंद केली. जाताना फौजदार म्हणाले, “सर, सायबांना पत्र लिहून अॅवॉर्ड द्यायला सांगा." आम्ही तसं पत्र दिलं. आऊ जाताना हरखली होती. म्हणते कशी, “गव्हर्नमेंट परत पोर मागणार नाही नव्हं?" या वाक्यात संस्थेतील साच्यांच्या कष्टाचं चीज होतं नि डॉक्टर, पोलिसांच्या प्रयत्नांची साथ. संस्था नावाची श्रेयदार होती नि मीही.

 संस्थेत चुकलेली, सोडलेली मुलं-मुली नेहमीच येत असतात. सर्वच मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेणं संस्थेस, पोलिसांना शक्य होत नाही. जंगलात चुकलेलं कोकरू कधीतरीच आईला परत मिळतं. कधी कोकरू मॅऽमं करत आईस शोधत हरवतं, तर कधी आई हंबरत दूध द्यायचं सोडते; पण जर का कोकरू परत मिळालं तर म्हणे तिला परत पान्हा फुटतो. पान्हा, पाझर जिवंत असतात. म्हणून माणुसकीस उशिरा का होईना, उमाळा येत असतो हेच खरं!

दुःखहरण/१०८