पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ठेवायचा. त्या वेळचा सूरदास पाहुण्यांच्या बोलण्यावरून ओळखायचा.. पाहणे पाहणरे आहेत की देणारे... ओहळबाईंना पुटपुटत असायचा... 'देंगी आली... (देणगी) देंगी आली' इतका हुशार होता... आता तर त्याला डोळे फुटले होते. अन् पुढे काही दिवसांनी तोंडही सुटू लागले; पण एक झालं की, तो हिंडू फिरू लागल्यावर सुटलेलं पोट आत गेलं.
 कालिदासला येऊन वर्ष, दीड वर्ष उलटून गेलं. त्याची प्रगती डोळ्यांत भरण्यासारखी होती. तो हिंडू, फिरू बोलू तर लागलाच; पण वात्सल्याच्या सगळ्या मुलांत मोठा असल्यानं खोड्याही करू लागला होता. चिमटे काढ, खेळ लपव, असे त्याचे उद्योग.. तक्रारी नित्याच्याच झाल्या होत्या. तशा त्या विभागाच्या प्रमुख सौ. हेब्बाळकर एक दिवस माझ्याकडे आल्या नि म्हणाल्या, “सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ‘सूरदास' चा 'कालिदास केला; पण हा तर आता ‘कालिया' होऊ लागला आहे. आपण त्याला बालगृहात ठेवू या." बालगृहाच्या पहिलीच्या पुढची मुलं असायची. स्वतःचं स्वतः मुलं-मुली करू लागली की, आम्ही बालसदनातून मुलामुलींना त्यांच्या बालगृहात हालवत असू.
 कालिदासला बालगृहात हलवणं मला प्रशस्त वाटलं नाही. बाईंना म्हटलं, “थोडे दिवस सांभाळून घ्या... थोडी कळ काढा. आपण पोलिसांकडे जरा आई-वडिलांचा शोध घेण्याचा लकडा लावू." मी गृह चौकशी करणारे परिविक्षा अधिकारी विष्णू शेटे यांना बोलावून घेतलं. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आमच्या संस्थेचे पदसिद्ध कार्याध्यक्ष असायचे. त्यांना कालिदासबद्दल सर्व माहिती, केलेले प्रयत्न, त्याची झालेली प्रगती सारं सविस्तर लिहन पालकांचा शोध प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिलं. श्री. शेटे यांना पाठपुरावा करायला सांगितला. तिस-याच दिवशी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे फौजदार व दोन पोलीस डी.एस.पी.ना लिहिलेलं आमचं पत्र घेऊन सलाम ठोकते झाले. त्यावर लिहिलं होतं, ‘त्वरित शोध घेऊन अहवाल सादर करावा. व्यक्तिगत लक्ष घालावे.'

 आम्ही आमच्याकडची सारी कागदपत्रं त्यांना दाखविली. मेवेकरींच्या दुकानाच्या फळीवर मुलगा सापडल्याचं सांगितलं. श्री. शेटेंना मदतीला दिलं तशी चौकशीची चक्रे गतीनं फिरू लागली. पोलिसांनी कालिदासचे दाखल होतानाचे फोटो इ. घेऊन रबकई गाठली. मेवेकरींनी बाईचं वर्णन केलं होतं. त्यात कपाळावर टण्णू असल्याचे, वय वर्षे अंदाजे इ. टीप्स दिलेल्या होत्या. कन्नड येणारा पोलीस घेऊन फौजदार रबकईला रवाना झाल्याचं कळालं होतं शेटेंकडून.

दुःखहरण/१०७