पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/107

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


काही माहिती नसेल, तर आम्ही नाव ठेवत असू... माहिती गोळा करत असायचो. त्याचं नाव सूरदास ठेवायची दोन-तीन कारणं होती... मी हिंदीचा प्राध्यापक असल्यानं सूरदास नावाचा कवी आंधळा होता हे वाचलेलं... ते नाव संस्थेत कोणाचंही नव्हतं. सहसा नसलेलं नाव ठेवायचो, द्विरुक्ती टाळायची. आलेला मुलगा मुका होता; पण गुणगुणायचा... चाळा म्हणून. एक जागी बसून असायचा... मासाचा गोळा वाटायचा... बसल्या जागी शी-शू करायचा... भरवायला पण लागायचं. वात्सल्य बालसदनमध्ये ओहळ बाई म्हणून काळजीवाहिका होत्या. त्या मुलांचा सांभाळ अत्यंत प्रेमाने करायच्या. माझ्या बालपणी त्यांनी माझाही सांभाळ केला असल्यानं मला त्याचा अनुभव व प्रचिती होती. मी त्यांना व देशमुख बाईंना ‘सूरदासा'ची विशेष काळजी घेत जा, तो परस्वाधीन आहे, हे लक्षात आणून दिलं. तशा त्या म्हणाल्या, ‘दादा, काळजी करू नका. राणी नाही का चालू लागली आपली. हा पण सर्व करेल. तुम्ही नका चिंता करू. तसा मी निश्चिंत झालो. अशी मुलं संस्थेत आली की झोप लागत नसे. रुखरुख असायची.
 सूरदासला येऊन आठ-पंधरा दिवस उलटून गेले. तो अपेक्षेपेक्षा लवकर रुळला. सर्व काळजीवाहिका त्याचे विशेष लाड करायच्या. आणखी काही दिवस गेले इकडे-तिकडे गेले असतील. डॉ. कारंडे एक दिवस माझ्याकडे आले नि म्हणाले, ‘‘सूरदासच्या हालचालींवरून त्याला अंधुकसं दिसतं असं वाटतं. तो आंधळा नसावा. लहानपणी वा जन्मतः फूल पडलं असावं. आपण डॉ. अतुल जोगळेकरांना दाखवून घेऊ या." त्याप्रमाणे लगेच आम्ही डॉ. जोगळेकरांशी संपर्क साधला. त्यांनी तपासणी केली व डॉ. कारंडेंच्या मताला दुजोरा दिला. फूल काढायचं ठरलं. डॉक्टरांची वेळ घेऊन आम्ही त्याचं ऑपरेशन केलं आणि काय चमत्कार... त्याला दिसू लागलं. आम्हा सर्वांना कोण आनंद झाला. मी लगेच एक गोष्ट केली. त्याचं ‘सूरदास' नाव बदलून ‘कालिदास' ठेवलं.

 कालिदासला दिसू लागलं तशा त्याच्या हळूहळू हालचाली वाढल्या... तो प्रतिक्रिया... प्रतिसाद देऊ लागला. त्याला दिसत नव्हतं तेव्हाची एक गोष्ट आठवते. आमच्या संस्थेस भेट देण्यास, देणगी देण्यास, तपासणी करण्यास, माहिती प्रशिक्षणास नित्य कोणी ना कोणी येत राहायचं. येणारा प्रत्येक जण वात्सल्य बालसदनास भेट द्यायचा. कोणी भेटीला आलं की मुलं ‘काका नमस्ते, ताई नमस्ते' म्हणायची नि स्वागत करायची. पाहुण्यांना बरं वाटायचं. त्यात कोण देणगीदार असेल, तर मुलांच्या हातावर खाऊ

दुःखहरण/१०६