पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षक होते. अवघा ऐंशी रुपये पगार हाती यायचा. भरल्या समृद्ध घरातून टाईल्सच्या घरातून मी शेणाने सारवायच्या घरात आले. १९७२ ते १९९२ या गेल्या वीस वर्षांत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं.
 आई निवृत्त होऊन काही दिवस माझ्याकडे राहिली. आता ती ताईकडे असते. दरम्यान, मला दोन मुले झाली. निशांत मोठा. नुकताच बारावी झाला. सी.ए. करतोय. छोटा अंकुर सातवीत शिकतोय. लग्नाच्या वेळी माझा शिक्षक असलेला माझा पती आज प्राध्यापक आहे. संशोधन, मार्गदर्शक, लेखक, संपादक, वक्ता, समाजसेवक, अनेक पुरस्कारांचा मानकरी, सर्व युरोप पालथा घालून आलेला दर्यावर्दी झालाय. स्वतःच्या टुमदार बंगलीत मी माझ्या सासूसह (सुनीलला आश्रमात सांभाळणाच्या आई) सुखावले आहे.
 आज माझं वय चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन उभं आहे. गेल्या चाळीस वर्षांचे अवलोकन करताना माझ्या लक्षात येतंय की अनाथपणाचं आभाळ पेलताना आश्रम, आई, ताई, दादा, माझे पती या सर्वांनी वेळोवेळी मला जो आधार दिला त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य. हे आभाळ पेलताना मला प्रत्येक क्षणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आलीय की आम्हा आश्रमातील मुलीत समाजानं नाकारावं असं काहीच नसताना समाज आम्हाला का नाकारतो? अनाथ मुली घरी-दारी नाही का असत? पाय घसरलेल्या किती माय-भगिनी घरंदाजपणाच्या बुरख्यात आपलं हरवलेलं कौमार्य, सौभाग्य, पावित्र्य नाही का लपवत आल्यात? आम्ही केवळ आश्रमाच्या आधार, आश्रयाने वाढलो म्हणून का आम्ही कमी?

 मला वाटतं, या सर्वामागे अनाथाश्रम, रिमांड होम यांसारख्या संस्था, तेथील मुले, मुली यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा विकृत नि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनच कारणीभूत आहे. यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. तशी संस्थांनी आपली कार्यपद्धती पण बदलणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आभाळ पेलण्यापूर्वीच ते फाटेल आणि खरं विचाराल तर ब-याच संस्थाश्रयी पुनर्वसित मैत्रिणी, भगिनींच्या जीवनाचं आकाश इतक्या ठिकाणी नि इतक्या त-हेने फाटलेलं असतं, त्यांच्या जीवनाची वाताहत पाहात असताना मला नेहमी जीर्ण, जर्जर, भोकाभोकांनी भरलेल्या, काड्या तुटलेल्या व भर पावसात वा-याच्या झंझावाताने उलटलेल्या छत्रीची आठवण येत असते. म्हटलं तर आसरा असतो; पण ब-याचदा निरुपयोगी.

दुःखहरण/१०३