पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण तीन महिने तसेच गेले. आमच्याच शहरात एक ट्रस्टचं हॉस्पिटल होतं. संस्थेची नि माझी सर्व माहिती देऊन त्यांनी प्लास्टिक सर्जरीसाठी प्रयत्न केले. शहरात आणखी एक निराधारांची संस्था होती. तिथले प्रमुखच त्या हॉस्पिटलचे सेक्रेटरी होते. त्यांच्यामुळे माझी सर्जरी विनामूल्य झाली. सर्जरी झाल्यावर जखमा वाळायला दोन महिने गेले; पण हात मोकळे झाले. खरं तर मी मोकळी झाल्यासारखं वाटलं.
 त्याच दरम्यान संस्थेत एक काळजीवाहकाची जागा भरायची होती. बाईंनी मनावर घेतलं. सेवायोजना कार्यालयात नाव नोंदवणं, कार्ड काढणं, कॉल काढणं, इंटरव्ह्यूची तयारी करून घेणं सारं बाईंनी पुढे होऊन केलं. ताईंच्या रूपाने मला साध्वीच भेटली. शासकीय नोकरी, पगार इत्यादीमुळे माझं आयुष्य बदललं. मी घराकडे संपर्क केला. हे काही बघेनात; पण मुलगी आली प्रथम. मी तिचे सर्व करताना हळूहळू मुलं येऊ लागली. एक घरी राहू लागला. दुसरा वडिलांकडे राहिला. मी मुलांचे शिक्षण, लग्न सारं पुढे होऊन केलं. क्षमा मागून कन्यादानासाठी तरी या म्हणून यांना गळ घातली. पहिल्यांदा लोकलाजेखातर का असेना आले. मग येत राहिले.
 संस्थेनं माझं जीवन बदललं. माणूस चुकतो; पण चूक पोटात घेऊन सुधारण्याचा मोठेपणा ना समाज दाखवतो ना घर. संस्था स्वर्ग वाटते, ती माणसाला त्याच्या नरकयातनांतून सोडवण्याच्या तिच्या निरपेक्षतेमुळे! संस्थेतली माणसं कोण कुणाची असत नाहीत; पण सगळ्यात दुःखाचा एक समान धागा असतो. दुःखी माणूसच दुस-याचं दुःख जाणतो. तसंच दुस-याचं दुःख आपलं म्हणणारे संस्थेचे प्रमुख आपले सर्वच होतात.. आई, वडील, मित्र, मार्गदर्शक सर्व! त्यांच्यामुळे नव्हत्याचं होतं होतं... जगणं सुसह्य होतं?

 आज मी जे दिवस पाहते... अनुभवते आहे ते पाहात मागे वळून बघताना खरंच वाटत नाही. एक काळ असा होता की, रोज विष खावं, आत्महत्या करावी, असं वाटायचं. माणसानं चूक करू नये खरं आहे; पण माणूस चूक का करतो, हे समजून घ्यायला हवं. माणूस ज्याच्या त्याच्या आतल्या आवाजावर नाचत असतो. माणसाला त्याच्या गुण-दोषासह समजून घेऊन स्वीकारायची उदारता ना समाजात असते ना आपल्या माणसात. मतभेद माणसाला दुरावतात, बिघडवतात. यांनी माझ्यासाठी थोडा वेळ काढला असता... मला थोडा वेळ दिला असता... मला समजून घेतलं असतं तर माझा पाय घसरला नसता. शेण माणूस सुखासुखी

दुःखहरण/९९