पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असण्यात वा नसण्यात मला रसही नाही. वाङ्‍‍मयाचा अभ्यासक या नात्याने सुर्वे यांच्या कवितेची अनुयायी असणारी कविता नगसेंकर लिहीत आहेत की नाहीत हा माझ्या रसाचा भाग आहे. सर्वे आपल्या कवितेला सुर्यकुलाची कविता मानतात. नगर्सेकरांची कविताही त्याच सूर्यकुलातील आहे. नगर्सेकर नारायण सुर्वे यांचे अनुकरण करत आहेत असे मला म्हणावयाचे नाही. कितीही चांगले व कुशल अनुकरण असले तरी ती अस्सल कविता नसते. खऱ्या कवीला इच्छा असली तरी अनुकरण करता येत नाही. खऱ्या कवीला स्वत:शीच इमानदार असल्याविना पर्याय नसतो.

 विंदा करंदीकर आणि शरश्चंद्र मुक्तिबोध यांचेही मन मार्क्सवादाने प्रभावित झालेले मन आहे. क्रांतीची ओढ व जिद्दोत्याही मनांत आहे आणि दोघेही मराठीतील ज्येष्ठ कवी आहेत असे मी मानतो.पण ते कामगार कवी नाहीत. नारायण सुर्वे हे पहिले कामगार कवी आणि त्यानंतर समर्थ असणारे दुसरे कामगार कवी नगर्सेकर. नगर्सेकर हे काळाने नंतरचे. त्याच कामगार जीवनातून वर आलेले. त्याच समाजवादी क्रांतीच्या स्वप्नांनी झपाटलेले. पण कालदृष्ट्या नंतरच्या दशकातले. या दृष्टीने ही कविता अनुयायी समजावयाची. बाकी सुर्वे यांच्या प्रतिभांची धाटणी वेगळी, नगर्सेकरांच्या प्रतिभांची धाटणी वेगळी, स्वत:ची वेगळी मांडणी, भाषा, प्रतिभा घेऊन हा नवा कामगार कवी वैभवात येतो आहे. तो सुर्वे यांच्या नंतरच्या दशकातील प्रमुख कामगार कवी, इतकाच अनुयायी शब्दाचा अर्थ समजावयाचा आहे.

 लेथवरच्या कामगारांना पोलादाचा खड्ग बनवा आणि शेतकऱ्यांनो तुमचा मातीत ठिबकणारा घाम आता डावीकडे वळवा, असे सांगणारा हा कवी घाम गाळणारा शेतकरी आपले दारिद्र्य जतन करीत मातीवर घाम सांडतो आणि स्वत: आपले कपाळ उजव्या खांद्यावर टेकतो. असे का घडते हे कधी विचारील का? लेथवरच्या कामगारांना क्रांतीपेक्षा पगारवाढीत रस का वाटू लागतो? हा प्रश्न विचारील का? ज्या दिवशी कवी हे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करील त्या दिवशी स्वप्ने आणि ती व्यवहारात साकार होणे यातील अंतर मोजावे लागेल. स्वप्नांनी धुंद असणाऱ्यांनी हे अंतर मोजलेच पाहिजे अशी कवितेच्या जगात सक्ती नाही. पण हे मोजणे कवींना वर्षीही नाही. आपल्या बेड्या तोडण्यासाठी येणाऱ्याविषयी साशंकता आणि या बेड्या अधिक बळकट करणाऱ्याविषयी विश्वास हा वेडेपणा वर्षांनुवर्षे कोटी कोटी लोकांच्या हातून घडत जातो. हे घडताना पाहणे हा मोठा यातनामय अनुभव असतो. आपली स्वप्ने न गमावता

विद्रोह / ९७