Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वास्तव कधी अधिक सार्थ तर कधी पूर्ण अर्थहीन असे पाहणे त्यांना भाग पडते. शेवटी क्रांतीची उत्कट ओढ असणारे सारेच कार्यकर्ते स्वप्नांच्याकडे पाहत जगत असतात. स्वप्ने पाहण्याची शक्ती नसेल तो क्रांतीचा पाईक होत नाही आणि ही स्वप्ने भावनेचा, जीवनाचा भाग झाल्याविना कुणी क्रांतीचा कवी होत नाही. वाद असला तर या ठिकाणी असतो की जी स्वप्ने तुम्ही पाहता ती तरी प्रामाणिकपणे तुमची आहेत की चलनी नाणे म्हणून बाजारातून भाड्याने आणलेली आहेत. नगर्सेकरांची कविता कुणाला आवडेल, कुणाला आवडणार नाही. पण या कवीच्या अस्सलपणावर कुणी वाद घालणार नाही, असा माझा भरवसा आहे.

 स्वप्नाचे कुतबमिनार खांद्यावर खेळविले आणि खांद्यावरची रायफल सन्मानाने वागविली असे हा कवी सांगतो. ज्यांना स्वत:च्या खांद्यावर स्वार झालेली स्वप्ने ओझे वाटत नाहीत, त्यांनाच खांद्यावरची रायफल सन्मानाने वागवता येते, असे इतिहास सांगतो. अरबी सुरस कथांच्यामध्ये एक सिंदबाद नावाचा नाविक आहे. सिंदाबाद एका बेटावर जातो आणि त्याची इच्छा नसताना एका कुबड्याचे ओझे त्याच्या खांद्यावर येऊन बसते. यानंतर सिंदबादचा सारा विचार हे ओझे खाली फेकून कसे द्यावे व आपण मोकळे कसे व्हावे या एकाच दिशेने चालतो. जे खांद्यावरील ओझे आपण उतरून टाकू इच्छितो तो आपल्या स्वप्नांचा प्रसाद मुळी नसतोच. इतरांनी लादलेला नसेल. आपणच न पेलणाऱ्या वेडाच्या आहारी गेलेले असू पण ओझे वाटतो तो ध्येयवाद नव्हे. आणि असे ओझे ज्या भूमिकांचे झाले आहे त्यासाठी लढणेही एक ओझे, एक बिगारच असते. पराभवाची ज्यांना जाणीवच नसते ते निर्बुद्ध सोडले तर साऱ्या ध्येयवादी स्वप्नपूजकांनी पराभव समजून घेण्याची पराकाष्ठा केलेली असते. पण पराभव जाणला तरी तो मानलेला नसतो. स्वप्नांशी एकरूप झालेल्यांना निराश होण्याची परवानगी त्यांचे मनच देत नाही. नगर्सेकरांची कविता ही या स्वप्नांना जन्म वाहिलेल्या कवीची कविता आहे. आणि ही स्वप्ने एका कामगार कवीची म्हणजे समाजवादी क्रांतीची आहेत. समाजवादी विचार बरोबर आहे की नाही हा काव्याबाहेरचा विषय आहे. पण ज्यांची समाजवादी निष्ठा अस्तित्व व्यापून बसलेली आहे ते कवी आहेत की नाहीत हा कवितेच्या कक्षेतील विषय आहे. नगर्सेकरांच्या रूपाने सुर्वे यांच्या कवितेला एक समर्थ अनुयायी मिळालेला आहे व तोही अस्सल कवी आहे. हे कुणी नाकारील असे वाटत नाही.

 कधी कधी मला शब्दांची फार भीती वाटते. मला म्हणायचे असते एक आणि हे शब्द वाचकांपर्यंत काही दुसरेच नेऊन पोहोचवतात. नगर्सेकर नारायण सुर्वे यांचे अनुयायी आहेत की नाहीत हे मला माहीत नाही आणि अनुयायी

९६ / थेंब अत्तराचे