Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३. विद्रोह


- सुरेश नगर्सेकर

 'जाण' हा सुरेश नगर्सेकर यांचा पहिला कवितासंग्रह. या पहिल्या कवितासंग्रहाचे स्वागत मराठी रसिकांनी चांगलेच केले. 'विद्रोह' हा नगर्सेकरांचा दुसरा कवितासंग्रह. पहिल्या संग्रहात नवखेपणाच्या ज्या काही खाणाखुणा जागोजागी दिसत होत्या त्या संपवून हा कवी आता प्रौढ व जाणता होऊन येतो आहे. याठिकाणी वापरलेला प्रौढ हा शब्द सर्वसामान्य अर्थाने घ्यावयाचा नाही. सामान्य व्यवहारात प्रौढ हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळी माणूस थोडा अधिक व्यवहारी व संयमी, अधिक शहाणा होऊन कार्य करणारा व सौम्य असे अर्थ आपल्या मनात असतात. भावोत्कटता आणि ध्येयनिष्ठा यांचा ऱ्हास व तडजोडवादाला शहाणपण मानणाऱ्या वृत्तीचा विकास या प्रौढपणात गृहीत असतो. हा व्यावहारिक प्रौढपणा सुरेश नगर्सेकरांच्या जवळ कालही नव्हता, आजही नाही. आपल्या भूमिकेविषयी अधिक स्वच्छ व अधिक ठाम वृत्ती आणि आपल्या भावनांना अधिक नेटके रूप देण्यात येणारे यश या अर्थाने आता हा कवी प्रौढ झालेला आहे. आणि कवी प्रौढ झालेला याचा अर्थ त्याची कविता बालपण ओलांडून ऐन विकासाच्या परिघात पोहोचलेली आहे.

 नगर्सेकरांच्या भूमिका ठाम आणि निश्चित आहेत. एका सुजाण कामगार कवीला जे नेटकेपणाने वाटावे अशी अपेक्षा आपण करतो त्या अपेक्षा जवळपास पूर्ण करणारी अशी ही कविता आहे. जीवनाचे रूप नेहमीच गुंतागुंतीचे असते; यात वाद नाही. पण गुंतागुंतीची जाणीव असणे म्हणजे कोणतीच ठाम भूमिका नसणे - अशी जी समजूत काही जणांच्या मनात पक्की ठसलेली आहे. ती मात्र मला मान्य नाही. सर्व गुंतागुंत जाणणे आणि आपली ठाम मते असणे यांत विसंगती आहे असे मी मानत नाही. जीवनाचा गंभीरपणे विचार करणाऱ्या कुणाही व्यक्तीला आपली मते आणि ती वारंवार छेदून जाणारे वास्तव यांचा वेध घ्यावाच लागतो. नगर्सेकरांची प्रवृत्ती हीच आहे. त्यांची मते ठाम व स्वच्छ असल्यामुळेच विसंवादी

विद्रोह / ९५