पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेव्हा नजर मावळून जाते, जेव्हा वर्तमान जगातले रंग विझून जातात तेव्हा स्मृतीतून रंग पुरविले जातात. या स्मृतीतून कवितेत पाझरणाऱ्या रंगच्छटा वेगवेगळ्या आहेत. या स्मरणातल्या रंगाचा पुरवठा कधी मनात मोरपिसे खोवून जातो. कधी नवे चांदणे घेऊन येतो. प्रेयसीच्या एका फांदीवर हिरवा रेशमी स्वप्नपिसारा असतो. तिच्या एका लाटेवर पंख-पांढरा जहाजपक्षी असतो. तिच्या क्षितिजावर गुलमोहराचा केशरी साज असतो, तिच्या मांडवावर जाईची स्वप्नफुले असतात. या प्रेयसीच्या ओठावर डाळिंबाची रक्तलाली नाही. तिचा देह सोनचाफ्याचा नाही. पण तिच्या केसावर उन्हे नाचरी होतात. पायावर उन्हे मोगरी होतात. या सखीला सांजवेळ होताच आकाशाच्या गोकुळात कृष्ण रगाचा खेळ खेळतो आहे हे सांगावेसे वाटू लागते. हे नानारंग स्मृतीतून पाझरलेले आहेत. याच्या खाणाखुणा कवितेतच आहेत.

 पण रंग मावळले म्हणून सारेच काही मावळत नाही. गंध आणि स्वरसंवेदना अधिक जागरूक होऊ लागतात. स्वरांच्या द्वारे कवी विश्वाचा अनुभव घेऊ लागतो. सळसळती लाट खळखळून फुटते व मऊ ओली रेती पायांना बिलगते. थंडगार जलस्पर्शातून अंग असे सुखावते की भोवतालचे हसरे नाचरे विश्व त्यातून साकार होऊ लागते. आता दंव ओली पाखरे गंधधुंद आहेत हे त्यांच्या स्वरातून कळू लागते. कृष्णेच्या घाटावर सगळे कसे शांत शांत आहे. अजून चौघड्यावर टिपरी पडलेली नाही, देवळातली काकडआरती अजून ऐकू येत नाही. धुलईचा तालध्वनी व स्नानाची वर्दळ जाणवत नाही. अजून सुगंधी पंख पसरून पहाट वारा आलेला नाही. सगळे काय डोळ्यांना दिसावे लागते असे थोडेच आहे! कानांनीही मनाला सारे जाणता येते.

 काळोख आणि निळाईची गुंफण करीत वैफल्य आणि औदासीन्य यांचे पदर प्रतिमांच्या नाजुक साधनाने उलगडीत या कवितेचा एक प्रवास चालू आहे. स्मरणातून रंग पुरवीत आणि रंग वगळून स्वरगंधातून विश्व अनुभवीत या कवितेचा दुसरा प्रवास चालू आहे. नव्या आशा आणि सुखांना नवी पालवी कुठे फुटते आहे, तर कुठे दुःखंच फुलोरा फुलवून कारंजाप्रमाणे नाचत आहे. अशी ही राम गोसावींची कविता आहे. ती इतरांच्यापेक्षा निराळी असूनही तिला स्वत:ची समृद्धी आहे. डोळे असणाऱ्यांचे डोळे नुसते भरूनच येऊ नयेत तर नवे डोळेही प्राप्त व्हावे अशी किमया करण्याची हौस असणारी ही कविता- तिला मी तिच्या सगळ्या प्रवासात यश चिंतितो.

९४ / थेंब अत्तराचे