पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन मोठे चिवट असते. कोणतीही आशा नसताना आशा करीत राहणे हा मनाचा खेळ असतो. गोसावींचे मनही हा खेळ खेळलेले आहेच. 'निद्रिस्त तळ्यात' सारख्या कवितेत ही कधी पूर्ण न होणारी आशा डोकावताना दिसते. झोपलेल्या तळ्यातील पाणीही झोपलेले आहे. झोपलेल्या पाण्यावर शेवाळे चढलेले आहे. बेडकांची गाणी बेसूर खर्जात आहेत. (खर्ज हा उरलेल्या सर्व चढ्या स्वरांचा आधार. तोच बेसूर असेल तर पुढचे सारेच स्वर फाटलेले असणार.) दाट लव्हाळ्यात रातकिडे किर्र करीत आहेत. जमलेला अंधार उसवण्यासाठी काजव्यांचा प्रयत्न चालू आहे. (काजवे कधी अंधार उसवू शकतील का?) जे काही ओलसर आहे तो पाचोळा आहे. त्यात शहारा सळसळत आहे. बाभळी वठलेल्या आहेत. त्यावर फडफडणारे वटवाघूळ लटकलेले आहे. सगळे वातावरणच असे उदास व व्याकुळ आहे. हे वातावरण मुक्तीची वाट पाहत आहे. एक आशा कवीच्याही मनात चुळबूळ करू लागते. आपलीही हरवलेली सोनपहाट पुन्हा गवसेल असे त्याला वाटू लागते. या आशेला वेडी म्हटले तरी ती असते हे सत्यच आहे.

 या ठिकाणापासून खूप दूर अशी एक विचित्र जाणीव असते. जे लादले गेलेले आहे तेही सहवासाने सवयीचे होत होत आवडते होऊ लागते एकही फट नसणारा आणि कुठेही काठ नसणारा सलग असा अंधार जिवलग होऊन चहूबाजूने बिलगू लागतो. गुबगुबीत मांजरासारखा सर्वांगावर पसरू लागतो. घनदाट आषाढमेघ यापूर्वी कवितेत फार निराळ्या अशा सूचना घेऊन आलेले होते. इथे त्यांच्या भोवतालची अर्थवलये वेगळीच होतात. अंधार आषाढघनाप्रमाणे सर्वांगात दरवळू लागतो. हा अंधारच प्रकाशगर्भ अस्थी कुरवाळून जतन करू लागतो. अंधाराचे किळसवाणे ओंगळ हात कुरवाळून सांभाळून घेऊ लागतात. कारण आता तो जिवलग होऊ लागला आहे. हरवलेल्या प्रकाशामुळे जन्मलेली व्यथा कारंजे होऊन उसळू लागली म्हणजे किती निरनिराळी रूपे धारण करते याची ही एक दिशाच म्हटली पाहिजे. डोळे जळून जरी त्यांची राख झाली तरी त्या राखेतन चैतन्याचा पक्षी नवी उसळी घेतो. विजेचे रंगचित्र विझून गेले तरी त्यामुळे संवेदना बोथट होत नाहीत. विजेचे स्वरचित्र कवी अनुभवू लागतो. फिरून उसळी घेणारा आशावाद हा कवीच्या मनात आहे. दु:खावर मात करणाऱ्या आशावादामुळे ही कविता चांगली ठरते, असे भोळसर विधान मी करणार नाही. पण या उसळणाऱ्या आशावादामुळे दु:खाची विविधता व समृद्धी सारखी विकसन पावत असते. या समृद्ध विविधतेत या कवीचे एक सामर्थ्य आहे हे कसे नाकारता येईल?

डोळे / ९३