पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्यसंमेलनाचे लक्ष वेधून घेतले हा फरक थोडा असा नाही. जन्मत: अंध असणाऱ्या कवीचे मन त्या अंधत्वाच्या चिर सहवासातच साकार झालेले असते. आपण खरोखरी काय गमावलेले आहे याचे यथार्थ आकलन या प्रकारच्या कवीला होत असेल काय? लोक आपल्याला अंध म्हणतात हे कळणे निराळे आणि स्वत:च्या आंधळेपणाची भावोत्कट प्रतीती निराळी. ती सूरदासासारख्या कवीला होत असेल काय? दृष्टी गमावल्यामुळे आपण काय गमावले याची विदारक जाणीव जशी राम गोसावींसारख्या कवीला असते तशी डोळे असणाऱ्या अगर मुळातच डोळे नसणाऱ्या कवीला होण्याचा संभव फार कमी. मी जी असाधारण घटना म्हणतो आहे ती ही आहे, दैवी आघात म्हणून आलेले हे अंधत्व गोसावींच्या या संग्रहातील केंद्र आहे.

 मी वर सर्वत्र असाधारण असा शब्दप्रयोग केला आहे. अनन्यसाधारण असा शब्दप्रयोग करण्याचे टाळले आहे. अनन्यसाधारण हा कलाकृतीचा विशेष धर्म मानला जातो. ज्यांच्या जीवनात असाधारण असे काही नाही, त्यांना चांगल्या कलाकृती निर्माण करता येणार नाहीत असे मला म्हणावयाचे नाही. ती भूमिका मला मान्य नाही. ज्यांच्या जीवनात असाधारण असे काही नाही त्यांना चांगली कलाकृती, सफल साहित्यकृती निर्माण करण्यात हमखास यश येते असेही मी मान्य करणार नाही. माझा मुद्दा वरील दोनपैकी कोणत्याही एकांतिकतेच्या जवळ सुद्धा न जाणारा असा अगदी साधा आहे. ललित वाङ्मयात व्यक्तिमत्त्वाच्यापृथगात्मतेला एक महत्त्व असते. अनुभवाच्या वेगळेपणाला, वैचित्र्याला एक महत्त्व असते. असाधारण घटना ज्याच्या जीवनात घडतात त्यांच्या मनाला पृथगात्मतेची देणगी निसर्गदत्त असते. हे जे अनुभवाचे निराळेपण असते. ते नीट समजून घेणे व हा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव कवितेत साकार करणे हे गोसावी यांना. किती प्रमाणात जमले आहे हे पाहण्याची मला जिज्ञासा होती. मराठी कविता गोसावींच्या काव्यामुळे अधिक पुष्ट झाली आहे असे मला वाटते.

 मी स्वत: वाङ्मयाचा आणि जीवनाचा संबंध आहे व असतो असे मानतो. पण तो संबंध अत्यंत गुंतागुंतीचा असतो. एकेरी व सरळ नसतो. लौकिक जीवनातील घटना ललित वाङ्मयात कोणते रूप धारण करतील याचा काही नेम नसतो. शेवटी वाङ्मयात व्यक्त होत असते ते कवीचे मन. या मनात जीवनातील घटनांना कोणती जागा आहे हे महत्त्वाचे असते. ज्यांनी डोळ्याचा प्रकाश गमावला ते आपणास कधीतरी डोळे होते हे विसरून जाऊनच फलश्रुती आणि गंध, चव आणि स्पर्श या संवेदनांच्या विश्वावर कविता सावरतील की आपली

डोळे / ८९