Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२. डोळे


- राम गोसावी

 राम गोसावी यांचा ‘डोळे' हा कवितासंग्रह वाचला. त्यांच्या कविता वाचण्याची उत्सुकता माझ्या मनात होतीच. ज्यांच्या जीवनात एखादी असाधारण बाब असते; त्यांच्या अनुभवाचे स्वरूपही थोड्याफार प्रमाणात असाधारण असते. या असाधारण अनुभवांना कलेत कोणते रूप मिळालेले आहे हे पाहण्याची जिज्ञासा माझ्या सारख्याला वाटणे स्वाभाविक आहे. राम गोसावी यांनी आपल्या संग्रहाला जे मनोगत जोडलेले आहे त्यात तर या असाधारण अवस्थेचा उल्लेख आलेला आहेच, पण हे मनोगत जरी नसते तरी कविता वाचताना ती अवस्था जाणवलीच असती. इ.स. १९२६ साली कवीचा जन्म झाला आणि कॉलेज जीवनापासून म्हणजे इ.स. १९४५ पासून कवितेच्या जीवनात प्रवेश झाला. १९-२० वर्षांच्या तरुण मुलाला कविता करण्याचा नाद असणे साहजिक आहे. तेव्हापासून इ.स. १९६५ पर्यंत हा कवी कविता लिहीतच होता. या प्रकाशितही होत होत्या. पण त्या कवितांच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. 'डोळे' या संग्रहातसुद्धा १९६५ पूर्वीच्या कविता फारच थोड्या असतील.

 इ.स. १९६५ साली दैवाच्या आघातामुळे राम गोसावी एकाएकी आंधळे झाले. वयाची एकूण चाळीस वर्षे चर्मचक्षूनी जंग पाहण्यात, जगाचे रंग न्याहाळण्यात गेल्यानंतर एकाएकी हा प्रकाश त्यांच्या जीवनातून मालवला. ही एक असाधारण घटना आहे. सुरळीतपणे चालणारे जीवन अकल्पितपणे उद्ध्वस्त करणारी आहे. इतरांना आधार देण्याची स्वाभाविक सवय असणाऱ्या पुरुषाला विकल, असहाय करणारी अशी ही घटना आहे. या वेदनेची कटुता अनुभवून तिच्यातील विकलतेवर मात करून उभा राहिलेला कवी हा व्यक्ती म्हणून सुद्धा मनाने, अनुभवाने मागच्या राम गोसावीपेक्षा निराळा आहे. हा नवाच जन्म लाभलेल्या कवीच्या असाधारण मनाची ही कविता आहे. मागच्या कवितेने कुणाचेच लक्ष वेधून घेतलेले नव्हते. या नंतरच्या कवितेने साऱ्या

८८ / थेंब अत्तराचे