जेव्हा दु:ख आपला स्पर्श करून संवेदनांचा पिसारा उमलविते त्यावेळी नाचणारेही दु:ख असते पण दु:खाचा थंड स्पर्श कुठे मनाचे कोपरे बधिर करीत असेल तर ते घडू नये म्हणून सुख आहे. दुःखाची ही शाश्वत गाथा म्हणजे जग मिथ्या मानणारे वेदांत दर्शन नव्हे. तर तो सत्य जगाचा एका सत्याकडून दुसऱ्या सत्याकडे, नेणारा धादांत स्पर्श आहे. म्हणून मार्क्सने असे म्हटले आहे की, माणसाची दु:खे मालवू नका. कारण दु:खाच्या शिडकाव्याने माणूस उमलतो, विकसित होतो पण माणसांना माणसांची दु:खे भोगू द्या. त्यांना जनावराची दु:खे भोगण्यापासून मोकळे करा. जनावरांची दुःखे माणसाला लाचार, क्रूर जनावर करतात. माणसाची दु:खे माणसाचे पशुत्व क्रमाने झाळतात व माणूसपण शुद्ध करीत जातात.
जन्माला येताना प्रत्येकजण रडतो, हा रडण्याचा सारखेपणा. ही झाली एक बाजू आणि प्रत्येकाचा आक्रोश स्वतंत्र, स्वयंपूर्ण असतो ही झाली दुसरी बाजू. जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला जे जे सुख अगर दु:ख येते त्याला या दोन बाजू असतात. सर्वांचा शेवट मरणावर होतो. हा मरणाचा सारखेपणा आणि प्रत्येक मरणाचा वेगळेपणा हा दुसरा भाग. प्रत्येक अनुभवाचा वेगळेपणा जपत कलाकृतीचा जन्म होतो आणि त्या अनुभवाचा सार्वत्रिकपणा या कलाकृतीच्या व्यापक आवाहनाला आधार होतो. अनुभवाचे व्यक्तिवैशिष्ट्य आणि त्याचा सार्वत्रिकपणा मिळून मूल्यांचा एक व्यूह निर्माण होतो. या दुःखा-दुःखाच्या पुन: परी असतात.
बुद्धाच्यावेळी दुःख होते. त्यानंतर हजार वर्षांनी शंकराचार्यांच्यावेळी दुःख होते. पुन: आठशे वर्षांनी तुकारामाला दु:ख होते. बुद्धाच्या मागे हजार वर्षे गेले तरी दुःख होतेच. हा मानवतेचा अखंड सहचर मानव बदलत गेला तसा स्वत: बदलत गेला आहे. दु:खाने माणूस आणि माणसाने दुःख असा दोघांनी एकमेकांचा विकास केला आहे. बालमित्रांच्या प्रवासासारखा हा प्रवास आहे. दोघेही बाल असतात. दोघेही तरुण होतात. दोघेही प्रौढ होतात. असा हा दोन समांतर रेषांचा आलेख नव्हे. तर दोघे एकमेकांना सतत छेदतात. कधी एक दुसऱ्याभोवती पिंगा घालतो, कधी दुसरा पहिल्या भोवती पिंगा घालतो, कधी दोघे मिळून तिसऱ्याभोवती पिंगा घालतात, अशी ही वेलबुट्टी आहे. म्हणून माणूस बदलतो आहे तसे दुःखही बदलत जात आहे. कशाचे दु:ख करावे हे भानही बदलत जात आहे. तरीही दुसऱ्या जगात दुःखाला एक परंपरा होती, त्याला सातत्य होते. कारण जन्मनाळ तुटतांना प्रत्येकाची समाजपुरुषांशी नाळ आपोआप जुटे. संसाराची नाळ तोडली की परमेश्वराशी नाळ जुटे.