- चंद्रकांत व्यवहारे
ही दिंडी आहे. एक यात्रा चाललेली. ती कुठे जात आहे, कशासाठी जात आहे या प्रश्नांना फारसा अर्थ नाही. सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूंची ही दिंडी आहे. हिचा प्रत्येक वारकरी आपल्या व्यथेचे आर्तपणे भजन करीत आहे. आर्त वेदनेच्या एका पांघरुणाखाली सगळे जमलेले आहेत म्हणा की, त्यांनी आपल्या व्यथेला देवता कल्पिलेले आहे असे म्हणा. आपल्या मनातले दुःख जगावर पसरून ते न्याहाळीत जाणारी ही एक यात्रा आहे. सुखाला जशी सुखाची नशा असते तशी दु:खाला दु:खाची धुंदी असते. या दुःखाच्या 'बेहोशीत जीवनातले सगळे वाळवंट बेंदरकारपणे तुडवीत पुढे चाललेली अशी ही एक यात्रा आहे. ती कुठे जाते की भुलवा झाल्याप्रमाणे जागच्या जागीच फिरत राहते हे कोण जाणे. जर पुढे काही मिळण्याजोगे असेल तर पुढे की मागे या प्रश्नाला अर्थ असतो. सगळेच व्यर्थ असले म्हणजे मग जो अर्थ पुढे जाण्याला असतो तोच मागे जाण्याला आणि जागच्या जागी फिरण्यालाही असतो.
ही वेदना आजचा युगधर्म आहे. मागोमाग दु:ख नव्हते असे नाही. माणसाने आपले माणूसपणच मासळीप्रमाणे दुःखाच्या सरोवरात जोपासलेले आहे. इच्छा आणि दु:ख यांची सोबतच माणसाला त्याच्या सांस्कृतिक प्रवासा-पासून लाभलेली आहे किंवा असेही म्हणता येईल की, इच्छा आहेत म्हणून दु:ख आहे. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी ते दु:ख आहे आणि इच्छा पूर्ण झाल्या तरी ते दु:ख आहे. दुःखानेच माणूस बोलका आणि मुका झाला आहे. तेच त्याला वाचाळ करते, जडमूढ करते. खलील जिब्रानने म्हटले आहे की, जीवनाच्या पाषाणात दु:खाची छिद्रे जितकी मोठी आणि खोल तितकेच सुख थांबू शकते. उरलेले सुख ओसंडून जाते. कविता म्हणून हे ठीक आहे. सत्य असे दिसते की, दु:ख संवेदनांना अधिक सक्षमही करते आणि संवेदना बोथटही करते. कुणाला तरी संवेदना बोथट होणे मान्य नाही. दुःखाने बधिर होणे कुणाला तरी मान्य नाही.