पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 समाजवादी विचारवंत भांडवलदार समाजाचे शोषण थांबणे किती आवश्यक आहे यावरही बोलतात. ही समाज व्यवस्था उलटून टाकण्यासाठी क्रांती करण्याची त्यांची उत्कट इच्छा असते. किसान, कामगार आणि मजूर यांनी एकत्र येऊन क्रांती करायला हवी असे समाजवाद्यांचे म्हणणे असते. हा सगळा विचार आवश्यकच आहे. पण त्यासह दुसराही विचार मधून मधून करायला हवा तो म्हणजे सर्व दरिद्री एकत्र का येत नाहीत. क्रांतीचे प्रयत्न पुन्हा पुन्हा का फसतात हा विचार केल्याविना भांडवलशाहीचे बलस्थान नेमके सापडणार नाही.

 मानवी जीवनात हा विसंवाद सारखा वाढतो आहे. जाती व्यवस्थेविरुद्ध संतापाने बोलणारांच्या वागणुकीतच जाती टिकून राहण्याची कारणे सापडतात. 'क्रांतीचा जयघोष करणाऱ्यांच्या कृतीतच क्रांती न होण्याची कारणे दडलेली असतात. भ्रष्टाचार आणि समाजवाद यांनाही हा नियम लागू आहे. व्यक्ती एरव्ही वेगळा विचार करते आणि स्वत:च्या हितसंबंधाचा विचार करण्याची वेळ आली म्हणजे वेगळा विचार करते. काही राज्यशास्त्रज्ञ 'शहाणा स्वार्थ' असा शब्दप्रयोग करतात, दूरवर विचार करून जे उचित ठरते आणि जवळचा ताबडतोबीचा विचार करता जे उचित ठरते त्यांतील हा संघर्ष आहे. या गुंतागुंतीचे भावनात्मक पातळीवर मनाची पूर्ण तयारी करणे हे सामाजिक जाणीव. कवितेचे एक महत्त्वाचे काम आहे. शरद देशमुखांच्या कवितेकडे या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

 प्रसिद्ध समाजवादी लेखक 'अॅप्टॉन सिंक्लेअर' यांच्या एका कादंबरीचे नावच 'जंगल' आहे. देशमुखांच्या एका कवितेचे नावही 'जंगल' आहे. जंगलाचे काही स्वाभाविक नियम आपण लक्षात घेतले पाहिजेत. जंगलात इतरांचा विचार करण्याची फुरसद कुणाला नसते. जो तो आपला विचार करीत असतो. कळप जरी असले तरी कळपातला प्रत्येक जण आपला आपला विचार करीत असतो. तुझी अडचण काय, तुझी वेदना काय हे विचारायला कुणी मोकळा नसतो. कळपाचे वर्तन आणि व्यक्तीचे हितसंबंध एकमेकांत गुरफटून तिथे जातात. मानवी समाज यापेक्षा निराळा असावा अशी अपेक्षा आहे. पण तो निराळा दिसत नाही. ही अडचण आहे. जंगलात न्याय-अन्याय, नीति-अनीती या कल्पनांना अर्थ नसतो. ज्याच्यात ताकद आहे त्याने खुशाल आक्रमण करावे. मानवी जीवनात याहून निराळे काही नाही, म्हणून हे ही एक जंगलच आहे असे अॅप्टॉन सिंक्लेअरला वाटते. हा जंगलाकडे पाहण्याचा माणसाचा

७८ / थेंब अत्तराचे