पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे सत्य तर आहेच पण ज्यांच्या जवळ गरजेहून फारच जास्त सोयी आहेत. तेही माणूस राहत नाहीत, पशू होतात. हे ही महत्त्वाचे सत्य आहे. जनावरासारखी जीवन जगणारी दरिद्री माणसे ही एकाच भांडवलशाहीची निर्मिती नसते. व्यसनात बुडालेली, वासनेच्या धोक्यात गरगरत असलेली, पशुतुल्य जीवन जगणारी सधन माणसे ही सुद्धा त्याच समाजरचनेची निर्मिती असते. उपभोगाचे तत्त्वज्ञान सांगणारे आचार्य मान्य ज्यांना होतात त्यांना आचार्य मान्य असतोच असे नाही. आचार्य सोयीचा असतो. वासनेत आपल्या मनाचे व जीवनाचे रितेपण विझविण्याची इच्छा तेवढी खरी असते.

 ही समाजरचना बदलण्याची भाषा सारेचजण बोलतात. इतके सारे जग या व्यवस्थेच्या विरोधात असताना ही व्यवस्था टिकते कशी असाही प्रश्न आपण कधी स्वत:ला विचारायला हवा. भांडवलशाही एक सामान्य नियम म्हणन लोकशाहीचा पुरस्कार करीत असते. भांडवलदारांनी स्वत:ला गैरसोयीच्या लोकशाया मोडून काढल्या आहेत. हुकूमशाह्या टिकवून धरल्या आहेत हे खोटे नाही. पण हा सामान्य नियम नाही. भांडवलशाहीचा सामान्य नियम लोकशाहीचा पुरस्कार असाच आहे. संपत्तीवान समाजात थोडेच असतात. या मूठभर धनवानांचे म्हणणे असे असते की, कोट्यवधी दरिद्र्यांनी नियमितपणे बहुमताने शासन निवडलेले असावे. आणि या मंडळीच्या हाती सत्तेची सूत्रे द्यावी. अलीकडे तर भांडवलदार मंडळी मजुरांचा संघटना करण्याचा व संघटितपणे न्याय्य हक्कासाठी झगडण्याचा हक्कही मान्य करू लागली आहेत. मजुरांनी संघटित व्हावे व पगारवाढ मागावी. दरिद्र्यांनी मतदान करून सत्ता निवडावी, असा आग्रह धनवान करू लागले आहेत. मूठभर संपत्तीवाल्यांना लाखो लोकांची भीती का वाटत नाही हा प्रश्न आपण विचारला म्हणजे समाज व्यवस्था कोणत्या आधारावर टिकते याचे उत्तर आपणास सापडते.

 जनता अडाणी आहे. तिच्यात भ्रम निर्माण करता येतात. धर्म आणि परंपरांचे आधार सोयीनुसार घेता येतात. दुबळ्यांना भीती दाखविता येते आणि दरिद्री मतदारांची मते विकत घेता येतात. यांपैकी खोटे काहीच नाही पण हे सारे स्पष्टीकरण अपुरे आहे. भांडवलशाही आपल्या आधारासाठी मुख्य आधार घेत असते तो भीतीचा नव्हे. तिचा आधार लोभ आणि आशा हा असतो. दरमहा १०० रु. मिळणारांना दोनशे रुपये मिळण्याची आशा असते. इच्छाही असते. मोठे भांडवलदार थोडे असतात. त्यांचे सामर्थ्य हजारो छोटे भांडवलदार हे असते. लाखो दरिद्री छोटे भांडवलदार होण्याची इच्छा धरून असतात.

ग्रासलेला सूर्य / ७७