गरिबी असतेच. ती नसताना तर मग हाल होणारच. मग मास्तर एक दोघांच्याकडे पोथी वाचायला जातात. जन्मभर पुण्याचा पाठपुरावा करावा. नीतीने वागणारे जे पुण्यवान त्यांचे कल्याण होतेच. त्यांची काळजी परमेश्वर घेतो असे प्रतिपादन करणारे ग्रंथं पुण्यवान मास्तरने वाचायचे. जन्मभर सरळपणे वागून ज्याचे काहीच कल्याण झाले नाही त्याने पोथ्या वाचायच्या हा अजन एक विसंवाद. जन्मभर ज्यांनी जीवनाबद्दल उमेद बाळगा हेच सांगितले, त्यानेच सर्व उमेद हरलेले जीवन व्यतीत करायचे अशी ही मास्तराची कविता.
या कवितेविषयी मी इतक्या विस्ताराने लिहिले याचे कारण, ही संग्रहातील पहिली कविता आहे हे नव्हे अगर ती सर्वांत चांगली कविता आहे हे नव्हे. माझा हेतू दोन बाबींच्याकडे लक्ष वेधण्याचा आहे. प्रथम म्हणजे कवी जरी आपली कविता सामाजिक चिंतनातून आली असे म्हणत असला तरी भावनात्मक चिंतन असणारी कविता शास्त्रीय चिंतनापेक्षा निराळी असते आणि दुसरे म्हणजे शरद देशमुख सतत विरोधी लय कवितेतून कशी साधतात इकडे लक्ष वेधावे. प्रा. शरद देशमुखांच्या कवितेत ही सततची जाणवणारी विरोधी लय ही एक महत्त्वाची बाब आहे.
अप्रतिष्ठित असणाऱ्या खऱ्याखुऱ्या पापभीरू आचार्यांच्या विषयी कवीच्या प्रतिक्रिया पाहताना त्या प्रतिष्ठित आचार्याच्या शेजारीही ठेवून पाहायला हव्यात. त्या दृष्टीने 'संभोगाच्या व्यासपीठावर' ही कविता विचारात घेण्याजोगी आहे. उघड्या मैदानात शेकडो शिष्यांना समाधीच्या नावाने विवेकशून्य होण्याची प्रेरणा देणारा हा आचार्यसुद्धा स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. कवीच्या पद्धतीने सांगायचे तर या व्यासपीठावरील आचार्याला संभोगासाठी स्वातंत्र्य हवे आहे. 'मास्तर' ही कविताही उद्वेगच सांगते पण तो उद्वेग समाजरचनेविषयी आहे. संभोगाचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या आचार्यांच्या कवितेतही उद्वेगच आहे पण तो सर्वांना नादी लावणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेविषयी आहे. माझ्या सारखा कवी नसणारा माणूस सहजच असा प्रश्न विचारतो की, या आचार्याला एवढा मोठा अनुयायी वर्ग का लाभतो.
एखादा योगी शेकडो मंडळींना सांगतो 'बसा', ते बसतात. तो म्हणतो 'हात जोडा!' ते जोडतात. मग गुरू महाराज म्हणतात, मी आशीर्वाद देतो 'पाया पडा!' ही अनुयायी मंडळी जयघोष करीत पाया पडतात. हे का घडते, हाही एक प्रश्न एकदा आपण विचारायला पाहिजे. किमान गरजेपुरतीही ज्यांची सोय नाही अशी माणसे माणूस म्हणून जगू शकणार नाहीत. त्यांचा पशू होतो