नक्की म्हणणे नाही. पण मास्तरांच्याकडून अपेक्षा मात्र समाजाला इष्ट गती देण्याची आहे.
मास्तरांच्या हाताखाली शिकलेली मुले आज त्यांच्याहून अधिक पगार उचलीत आहेत यात नवल काहीच नाही. कारण या हाताखाली शिकलेल्या मुलांनी नेहमीच आपण मास्तर व्हायचे नाही असे ठरविलेले असते. मुल शिकण्यासाठी येतात कशाला? त्यांना उत्तीर्ण व्हायचे असते. पास झाल्यावर नोकरी. ती मास्तरांची नको. कारण तिथे फारसा पैसा नाही. अधिक पैसा देणारी नोकरी हवी हा विचार करीत जी मुले मास्तरांच्या हाताखाली शिकली तरी, जरी सफल झालेली असली तरी मास्तरांच्यापेक्षा अधिक पगार घेणारी असणारच. नवल वाटणारा भाग त्याहून निराळा आहे. जे कुण्याच मास्तराच्या हाताखाली फारसे काही शिकले नाहीत आणि जे शिकले व त्यात तज्ज्ञ झाले ते ज्ञान कुणा मास्तराने दिले नाही. त्यांना पैसा सर्वांत जास्त मिळतो. ज्ञानाच्या प्रमाणात पैसा मिळत नसतो. पदवीच्या प्रमाणातही पैसा मिळत नसतो. सर्वात जास्त पैसा त्या ज्ञानावर मिळतो जे ज्ञान विद्यार्थ्याला मास्तराने दिलेले नसते.
मास्तराचे खरे दु:ख माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्याला जास्त पैसा मिळतो हे नसते. मास्तरांनी त्यात नेहमीच आनंद मानलेला असतो. मास्तराचे खरे दु:ख हे असते की, त्यांच्या हाताखाली शिकलेला मोठा पगार व सत्ता असणारा त्यांचा विद्यार्थी- मास्तराकडे वाया गेलेला अप्रतिष्ठित म्हणून पाहत असतो. विद्यार्थ्याच्या मनात जर शिक्षकांच्या विषयी प्रामाणिक आदरबुद्धी असती तर जगाचे चित्र बदलून गेले असते. पैसा महत्त्वाचा नाही, ज्ञान महत्त्वाचे आहे हा मुद्दा ज्या दिवशी मास्तरांना पगार पदरात पडावा यासाठी शिकवावा लागतो त्या दिवशीच सर्व विसंवादाचा आरंभ झालेला आहे.
दर वर्षी विद्यार्थ्यांना निरोप द्यावा लागतो. निरोप देताना दरसाल मार्गदर्शन करावे लागते. या विद्यार्थ्यांचा लळा मास्तरांना असतो. निरोप देताना डोळे पुसतात. विद्यार्थ्यांनाही मास्तरांचा लळा असतो. निरोप घेताना मुलेही रडतात आणि उभयपक्षी प्राय: भावना प्रामाणिक असतात. त्या क्षणी ते दु:ख खरेच असते. पण काही दिवसांत त्याच्या आठवणीही पुसून जातात. विद्यार्थ्याच्या जीवनाला नवा प्रवाह असतो. पुढे जाण्याची ओढ असते. शिक्षकांच्या मनात मात्र स्मृती रेंगाळत असतात. जीवनाचा निर्वाह या ओल्या स्मृतींच्या भरवशावर चालत नाही. ही खरी अडचण आहे.
एक दिवस मास्तर रिटायर होतात. पेन्शनीत जातात. नोकरी असतानाही